विश्वकर्मासाठी 3 हजार 567 कारागीरांकडून नोंदणी

विश्वकर्मासाठी 3 हजार 567 कारागीरांकडून नोंदणी

नाशिक ः प्रतिनिधी
व्होकल फॉर लोकल हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे  नागरिकांनी प्रामुख्याने स्थानिक व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी, असे आवाहन विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी यांनी केले होते.त्यानुसार विश्वकर्मा जयंती दिनी 17 सप्टेंबर पासून विश्वकर्मा योजनेस प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील 1388 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 567 कारागिरांनी योजनेसाठी अर्ज दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील 1388 ग्रामपंचायतीतील  1346 गावाच्या सरपंचांची नोदणी प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली आहे.जिल्ह्यातील 3 हजार 567 कारागिरांनी योजनेसाठी अर्ज दिले आहेत.ग्रामपंचायतीतील सरपंच यांची नोंदणी पीएम विश्वकर्मा पोर्टलवर करण्यात आली आहे. सरपंच नोंदणीमध्ये राज्यातील सर्वाधिक नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाल्या असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी दिली. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सीएससी सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
17 सप्टेंबर म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशात या योजनेची सुरवात करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर सीएससी सेंटरच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे हे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर प्राथमिक पडताळणी ही गावातील सरपंच यांच्या माध्यमातून होणार आहे तर द्वितीय पडताळणी ही जिल्हा स्तरावरून होईल. पडताळणी  यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याननंतर लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यानानंतर लाभार्थी हे आपल्या जवळील प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण नोंदणी करू शकतात. हे प्रशिक्षण 5 दिवसांचे असून प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीना दररोज 500 रुपये प्रमाणे भत्ता दिला जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उपकरणे खरीदेसाठी  15हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यानंतर लाभार्थी हे व्यवसायाच्या उभारणीसाठी कर्जाची मागणी करू शकतात.
योजनेचे लाभ काय?
विश्वकर्मा योजनेत 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला असून, त्यासंबंधी एका ई-बुकलेटचेही  काढण्यात आले आहे. या योजनेनुसार कोणत्याही हमी वा तारणाविना कारागीर व श्रमिकांना दोन हप्त्यांत एकूण तीन लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल. यातील पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळणार असून, त्याची परतफेड  मासिक 18हप्त्यांत करायची आहे. या कर्जाचा दुसरा टप्पा दोन लाख रुपयांच्या स्वरूपात असून त्याची परतफेड 30 मासिक हप्त्यांद्वारे करावी लागेल. विशेष म्हणजे, या लाभार्थी कर्जदारांकडून अत्यल्प म्हणजे पाच टक्के दराने व्याजाची आकारणी केली जाणार आहे. उर्वरीत आठ टक्के व्याजाचा भार सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसाय मंत्रालय उचलणार आहे. या कर्जाचे पतहमी शुल्कही केंद्र सरकारच भरणार आहे.

विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांची नोंदणी तसेच त्यांच्या बोटाचे ठसे घेण्याचे ग्रामपंचायत विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील 1385 ग्रामपंचायतींपैकी 1346 गावांच्या सरपंचांची नोंदणी प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

विश्वकर्मा योजनेद्वारे पारंपरिक व्यवसायास चालना मिळावी,व्यवसाय पुढील पिढीकडे जावा, गावामध्ये राहून व्यवसायाय वृद्धीस चालना मिळण्यासाठी सरपंच नोंदणी तसेच कारागीर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
वर्षा फडोळ
ग्रामपंचायत
उपमुुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *