उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसने यश मिळविल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत जितके आनंदाचे वातावरण आहे त्यापेक्षा अकि विश्वास निर्माण केला आहे. आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढल्या, तर भारतीय जनता पार्टीचा पराभव करणे शक्य असल्याचा एक विश्वास या पोटनिवडणुकीच्या निकालात दिसून येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन होऊन जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. या कालावधीत तीनही पक्षांमध्ये कुरबुरी झाल्या नाहीत, असे काही नाही. कुरबुरी आणि काही प्रमाणात मतभेद असले, तरी त्यामुळे सरकार अस्थिर होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. भाजपाला संधी द्यायची नाही, या एकमेव हेतूने तीनही पक्ष मंत्रालयात एकत्रितपणे सरकार चालवत असले, तरी स्थानिक पातळीवर या पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तसा ताळमेळ नाही. या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित कार्यक्रम झालेले नाहीत, तर स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. मात्र, एखाद्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक असेल, तर ती जागा ज्या पक्षाकडे होती किंवा त्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार भाजपाविरुध्द दुसर्या क्रमांकावर असेल, त्या जागी त्या पक्षाच्या उमेदवाराला तीनही पक्षांनी पाठिंबा देण्याचे सूत्र महाविकास आघाडीचे आहे. उत्तर कोल्हापूरची जागा कॉंग्रेसची असल्याने जयश्री जाधव यांनाच पाठिंबा देणे अपरिहार्य ठरले. महाविकासच्या नेत्यांनी एकत्रित प्रचार केल्याने जयश्री जाधव यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. विरोधी पक्ष या नात्याने भाजपाला ही जागा लढविणे अपरिहार्य होते. कॉंग्रेसकडून ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपाने कॉंग्रेसमधूनच आलेले सत्यजित (नाना) कदम यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली. महाविकास आघाडी सरकारविरुध्द भाजपाने काहूर उठवून एक वातावरण निर्माण केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात सरकारविरुध्द तोफ डागून या वातावरणात भर टाकली. उत्तर कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसचा पराभव करुन जनमत सरकारविरुध्द असल्याचे दाखवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसत पोटनिवडणूक हिंदुत्वावर नेऊन ठेवली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाला जोरदार प्रत्युत्तर दिले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचार करुन भाजपाचा मनसुबा उधळून लावला. जयश्री जाधव यांच्या विजयाने महाविकास आघाडीत आणि आघाडीच्या नेत्यामध्ये आत्मविश्वास दुणावला आहे.
पोटनिवडणुकांतील यशापयश
महाविकास आघाडीला आतापर्यंत तीन पोटनिवडणुकांत निर्भेळ यश मिळालेले नाही. पंढपूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गमवावी लागली, तर देगलूर आणि उत्तर कोल्हापूर कॉंग्रेसने राखले. गेल्या वर्षी मे महिन्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान औताडे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जागा खेचून घेतली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांचा निसटता पराभव झाला. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणारे समाधान औताडे यांना 22 टक्के मते मिळाली होती. भारत भालके यांना 37 टक्के, तर भाजपाचे सुधाकर परिचारक यांना 31 टक्के मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत भाजपाने परिचारक यांना डावलून औताडे यांना जवळ केल्याने भगीरथ भालके यांचा पराभव शक्य झाला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारविरोधात जनमत असल्याचा दावा करण्याची संधी भाजपाला मिळाली होती. उत्तर कोल्हापूरमध्ये तीच संधी मिळाली नाही. मात्र, मतांच्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. उत्तर कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांना 54.56 टक्के म्हणजे 97 हजार 332, तर सत्यजित कदम यांना 43.34 म्हणजे 78 हजार 25 मते मिळाली. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव यांना 51.93 टक्के म्हणजे 91 हजार 53 मते पडली होती, तर त्यांचे विरोधक शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना 43.29 म्हणजे 75 हजार 854 मते पडली होती. पोटनिवडणुकीत मतदारसंख्या वाढली. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्षा विरोधातील मतदानाच्या टक्केवारीत फार बदल झालेला नाही. सन 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होती, तर दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होती. यावेळी जयश्री जाधव यांची मते तीन-साडेतीन टक्क्यांनी शिवसेनेमुळे वाढली. तरीही एकूण टक्केवारीत शिवसेनेच्या मतांची मोठी भर पडलेली नाही. राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. उध्दव ठाकरे यांनी नकार दिल्याने कॉंग्रेसला दिलासा मिळाला, तरी फार फरक पडलेला नाही. डिसेंबर 2021 मध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी शिवसेनेतून भाजपात गेलेले सुभाष साबणे यांचा 41 हजार मतांनी पराभव केला होता. सन 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांचा 22 हजार मतांनी पराभव केला होता. या ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद वाढली. हे निश्चित.
मनोमिलनाचा प्रश्न
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढविल्या, तर भाजपाचा पराभव करणे शक्य असल्याचे पोटनिवडणुकांत आणि पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघांतही (विधान परिषद) दिसून आले. नगरपंचायतींच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढूनही या तीन पक्षांनाच सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तीनही पक्ष निवडणुकांसाठी एकत्र येऊ शकतात. एकत्र येणे जितके महत्वाचे आहे तितकेच स्थानिक पातळीवर तीनही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येणे तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु, स्थानिक पातळीवर म्हणावे तसे मनोमिलन झालेले नाही. लांबणीवर पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी तिन्ही पक्ष करत होते. आताही तशीच तयारी आहे. स्थानिक प्रश्न वेगळा असतो. मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी तीनही पक्षांतील कार्यकर्ते संघटित झाले, तर महाविकास आघाडीच्या पदरात लाभ पडू शकतो. महाविकास आघाडीतील पक्षांनी आमच्याशी स्वतंत्रपणे लढून दाखवावे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपाची मदार मतविभाजनावर बरीच असते, हाच पाटलांच्या म्हणण्याचा मथितार्थ. याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर केला, तरच पोटनिवडणुकांतील निकालांचा सोयीचा अर्थ काढता येईल.