राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज (दि. 15 जानेवारी) मतदान होत आहे. कुठलीही निवडणूक ही लोकशाहीच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची असते. म्हणूनच निवडणुकीला लोकशाहीचा ’आत्मा’ म्हटले जाते. निवडणुका हा लोकशाहीचा ’उत्सव ’आहे. या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग, शासन-प्रशासन, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते सगळेच प्रयत्नशील असतात. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. निवडणुका या निर्भीडपणे, निष्पक्षपातीपणे, सर्वांना समान संधी देत, खेळीमेळीच्या वातावरण पार पडल्या तर अशा निवडणुकीला अर्थ आहे. हेच लोकशाहीत अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून देशातील राजकारण व सत्ताकारणाचे संदर्भच बदलून गेले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे स्वरूपच बदलून गेले आहे. 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने अनेक वाईट गोष्टी समोर आल्या. विचारधारा, पक्षनिष्ठा, नीतिमूल्ये, नैतिकता याला तिलांजली देत सर्वांनीच सगळ्यांशी सोयीस्करपणे आघाडी केली, तोडली, उमेदवार पळवले, कोण कोणाचा मित्र आणि शत्रू आहे, हेच मतदाराला कळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातच कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ताच उपेक्षित राहिला आणि सर्वपक्षीय नेत्यांनी तिकिटे वाटताना पहिली प्राथमिकता कुटुंबीयांना दिली. विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी मनी पॉवर, मसल पॉवर याच्या बळावर निवडणुका लढल्या जात आहेत. सत्ताधारी पक्ष यंत्रणांचा मुक्तपणे गैरवापर करत आहे. ज्या निवडणूक आयोगाची मुक्त वातावरणात निवडणूक घेण्याची जबाबदारी आहे त्याच्या कार्यपद्धतीवर मतदाराला विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. मतदार याद्यांपासून मतमोजणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कधीकाळी तुमचा दाऊद तर आमचा गवळी इथपासून सुरू झालेला गुंडाच्या उदात्तीकरणाचा प्रवास आता गुंडागिरी कायदेमंडळाच्या प्रवेशद्वारावर येऊन ठेपली आहे. गुंडांना तिकिटे देणे ही सर्वपक्षीयांची अपरिहार्यता बनली आहे. पैशाचा मुक्त वापर करून मतदार खरेदी केला जात आहे. मतदानाच्या आदल्या रात्री जिकडेतिकडे भरभरून लक्ष्मीदर्शन घडवले जात आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून कोटी कोटी रुपयांची देवाणघेवाण होत आहे. पैशाने निवडणूक व्यवस्थाच करप्ट झाली आहे. वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना मतदारदेखील हात धुऊन घेताना दिसतात. अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीत केवळ पैसा ही बोलता है. मात्र, जिथे देशातील जनतेला सरकारच्या पाच किलो धान्यावर जगावे लागते, महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकट आहे, बहुतांशी जनतेकडे किमान गरजा भागवण्याऐवढी मिळकत नाही तिथे कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवढा पैसा राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्याकडे येतो कुठून, याचे उत्तर जनतेला कधीच मिळत नाही. आता लवकरच 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. त्यावेळेसदेखील लोकशाहीचे असेच धिंडवडे निघतील. खरोखरच अशा पद्धतीने जर निवडणुका होत असतील तर लोकशाही बळकट होईल का? निवडणुका हा केवळ पैशाचा खेळ बनला आहे आणि एक फार्स झाला आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यासाठी तुम्ही-आम्ही सगळेच जबाबदार आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव नसून मतदान खरेदी-विक्रीचा एक दिवसाचा बाजार झाला आहे आणि पैशाच्या जोरावर निवडणुकीचे सोपस्कार पार पाडले जात आहेत.
निवडणुकीच्या काळात मतदारापुढे विनम्रपणे हात जोडून असलेले, नंतरच्या काळात मात्र आपण देशाचे/राज्याचे मालक आणि मतदानाच्या दिवशी एक दिवसाचा ’राजा’ ठरलेला मतदार हा आपला सेवक/गुलाम आहे अशी वागणूक देतात, हे कटू सत्य आहे. ना त्याला काही प्रश्न विचारण्याची सोय, ना राज्यकर्त्यांना त्यांच्या चुका दाखवून देण्याची सोय उरते. ’गरज सरो वैद्य मरो’ अशीच या एक दिवसाच्या ’राजाची’अवस्था बनली आहे. मतदार राजाने एखादी दारूची बाटली, हजार-पाचशे रुपयांच्या प्रलोभनाला न भुलता आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागून उघडा डोळे बघा नीट या पद्धतीने मतदान करायला हवे. मतदान चुकीचे झाले की, त्याची किंमत, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महागडे शिक्षण, महागडे औषधोपचार या रूपाने मतदार राजाला मोजावी लागते. गेलेली वेळ परत येत नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला गेलाच पाहिजे. आतातर ’नोटा’चा पर्यायदेखील उपलब्ध आहे. राजकीय पक्ष, नेते यांच्याबाबतचे प्रेम बाजूला ठेवून मतदार राजाने निर्णय घ्यायला हवा. निर्णय चुकला तर पक्ष, नेते यांचे काही बिघडत नाही. मात्र, त्याची किंमत तुम्हा-आम्हालाच मोजावी लागते. मतदार राजा ’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, तुझे भवितव्य तुलाच घडवायचे आहे, तेव्हा आपल्यातील, आपली ताकद ओळखून, कुणाच्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडता योग्य लोकसेवकांना ताकद दिली पाहिजे, तर स्वार्थ साधणार्यांना धडा शिकविण्यासाठी होत असलेल्या निवडणुकीत आपला हक्क बजावायलाच हवा. समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात त्याप्रमाणे मतदार राजा /जनता ही देशाची खरी मालक आहे, तर निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे लोकसेवक आहेत, तेव्हा मतदार राजाने केवळ एक दिवसाचा राजा ठरू नये.
Voter: King for a day
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…