येवला शहरात मतदारांचा अमाप उत्साह

लांबच लांब रांगा; दुपारी दोननंतर मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी

येवला : प्रतिनिधी
येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2) मतदान प्रक्रिया पार पडली. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा अमाप उत्साह दिसून आला. मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. लोकशाहीचा महोत्सव पार पाडण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी दोन, तर नगरसेवकपदासाठी 89 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरातील जनता विद्यालयात भुजबळ परिवारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ, हिराबाई भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 11 पर्यंत मतदार कमी प्रमाणात होते. मात्र, दुपारी दोननंतर शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढत गेली. महिला, पुरुष, वयोवृद्ध युवक, युवती आदींची मतदानासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. रुग्ण मतदारांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय, एन्झोकेम विद्यालय, जनता विद्यालय, तसेच मुस्लिम भागातील अँग्लो उर्दू हायस्कूल, छोटी जनता विद्यालय, रेल्वे स्टेशन परिसरातील प्राथमिक शाळा, स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक शाळा आदी मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, शहरातील मुस्लिम भागातदेखील मतदारांचा उत्साह दिसून आला. सर्व मुस्लिम बांधवांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, रिपाइं (आठवले गट), महायुतीच्या उमेदवारांसाठी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खैरे, संभाजी पवार, हुसेनभाई शेख आदींनी मतदान केंद्रांवर भेटी दिल्या, तसेच शिवसेना शिंदे गट, मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, युवा नेते कुणाल दराडे, शिवसेना नेते किशोर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे आदींनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या. शहरातील प्रत्येक भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त
ठेवला.

भवितव्य मतदान यंत्रांत बंद

नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार आणि नगरसेवकपदाच्या 26 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, रिपाइं (आठवले गट), महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेेंद्र लोणारी, तर शिवसेना शिंदे गट मित्रपक्षांचे उमेदवार रूपेश दराडे या दोन उमेदवारांसह नगरसेवकपदासाठी उभ्या ठाकलेल्या 89 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *