नगराध्यक्ष, 26 नगरसेवकांच्या जागांसाठी आज सिन्नरला मतदान

54 हजार 387 मतदार बजावणार मतदानाचा हक्क; अध्यक्षपदाच्या 5, तर सदस्यपदाच्या 94 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज, मंगळवारी (दि.2) थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या 30 पैकी 26 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी पाच, तर 15 प्रभागांत 30 नगरसेवकपदाच्या जागांसाठी 105 असे दोन्ही मिळून 110 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पैकी नगराध्यक्षपदासाठी पाच, तर 26 सदस्यपदाच्या जागांसाठी 94, असे एकूण 99 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद होईल.

प्रभाग क्रमांक 2 अ, 4 अ, 5 अ आणि 10 ब या चार जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
मंगळवारी होणार्‍या मतदानासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत नाईक, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी दिली. दरम्यान, सोमवारी दुपारी मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले होते.
सिन्नर नगरपरिषदेसाठी 15 प्रभागांत 58 मतदान केंद्र आहेत. प्रभाग क्रमांक 2, 4, 5 आणि 10 मध्ये एक कंट्रोल युनिट, एक बॅलेट युनिट, अशी मतदान यंत्रे असणार आहेत. इतर मतदान केंद्रांवर एक कंट्रोल युनिट, दोन बॅलेट युनिट अशी मतदान यंत्रे असणार आहेत.
तीस यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी 350 अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत.
शहरातील 15 इमारतींमध्ये 58 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
या निवडणुकीत 54 हजार 387 मतदार मतदान करणार आहेत. त्यात 28 हजार 347 पुरुष, तर 26 हजार 30 महिला व इतर दहा असे मतदार आहेत.

निवडणुकीची बुधवारी मतमोजणी

सिन्नर नगरपरिषदेचे मंगळवारी (दि. 2) मतदान झाल्यानंतर बुधवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. 15 टेबलवर प्रत्येकी 15 प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. थेट नगराध्यक्ष व नगरसेवक याची मोजणी एकाच टेबलावर केली जाणार आहे. दुपारी दोन ते तीनपर्यंत मतमोजणीचा निकाल अपेक्षित आहे.

असे असतील मतपत्रिकेचे रंग

सिन्नर नगरपरिषदेसाठी थेट नगराध्यक्ष व दोन नगरसेवकपदासाठी प्रत्येक प्रभागात मतदान करता येणार आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी एक, तर सदस्यपदासाठी एक मतदान यंत्र असणार आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या मतपत्रिकेचा रंग फिक्कट गुलाबी, अ प्रभागातील उमेदवाराची मतपत्रिका
सफेद रंगाची, तर ब प्रभागाच्या उमेदवारी मतपत्रिका फिक्कट निळी (आकाशी रंगाची) असणार आहे.

प्रभागानिहाय मतदान केंद्र असे (कंसात मतदान केंद्र संख्या)

प्रभाग क्रमांक 1- होरायझन अकॅडमी (4 केंद्रे), प्रभाग क्रमांक 2- ब. ना. सारडा विद्यालय (4 केंद्रे), प्रभाग क्रमांक 3- ब. ना. सारडा जुनी इमारत (3 केंद्रे), प्रभाग क्रमांक 4-महात्मा फुुले विद्यालय (4 केंद्रे), प्रभाग क्रमांक 5- महात्मा फुले विद्यालय (6 केंद्रे), प्रभाग क्रमांक 6 – जिल्हा परिषद शाळा 1 (4 केंद्रे), प्रभाग क्रमांक 7- होरायझन अकॅडमी (3 केंद्रे), प्रभाग क्रमांक 8- चांडक कन्या विद्यालय (5 केंद्रे), प्रभाग क्रमांक 9- शासकीय आयटीआय (3 केंद्रे), प्रभाग क्रमांक 10- नाशिप्रचे संजीवनी विद्यामंदिर, सरदवाडी रोड (4 केंद्रे), प्रभाग क्रमांक 11- जि. प. शाळा संजीवनीनगर झापवाडी (3 केंद्रे), प्रभाग क्रमांक 12- लोकनेते वाजे विद्यालय (5 केंद्रे), प्रभाग क्रमांक 13- भिकुसा हायस्कूल (3 केंद्रे), प्रभाग क्रमांक 14- सावित्रीबाई पवार विद्यालय, पांडवनगरी (4 केंद्रे), प्रभाग क्रमांक 15- नवजीवन डे स्कूल (3 केंद्रे).

निवडणूक प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त

सिन्नर शहरात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी के. के. पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीसाठी 12 पोलीस अधिकारी, 107 पोलीस कर्मचारी, 92 गृहरक्षक दलाचे जवान, एक दंगा नियंत्रक पथक, असा मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *