उठा उठा…  निवडणूक आली…! (भाग – १)

डॉ. संजय धुर्जड.
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या भारताच्या १८व्या लोकसभेचे, ५४३ सदस्य निवडण्यासाठी भारतात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होत आहे. सदर निवडणुका सात टप्प्यांत होतील आणि निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होतील. २०१९ मधील भारतीय सार्वत्रिक निवडणुकीला मागे टाकणारी ही जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक असेल आणि ४४ दिवस चालेल.
सलग दुसरी टर्म पूर्ण करणारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत, व विजयाची हॅट्रिक नोंदवून पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची जोरदार तयारी सुरू आहे. “अब की बार चार सौ पार” चा नारा देऊन इतक्या मोठ्या संख्येत  एखादे गैर काँग्रेसी सरकार स्थापन करून इतिहास घडवू पाहत आहे. असे झाले तर उत्तमच होईल, यात काही शंका नाही, या माझ्या मताशी सहमत असणारे हजारो, लाखो करोडो मोदी समर्थक आणि भाजपायी कार्यकर्ते तन, मन धनाने कामाला लागलेले आहेत. निवडणूक म्हणजे, लोकशाहीचा आत्मा. लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांचे सरकार स्थापन करण्याची पहिली पायरी म्हणजे निवडणूक…!
या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचे आहे. “मत-दान” शब्दाचा अर्थ “मताचे दान करणे”. खरोखरच, मला वाटते की आपण आपल्या मताचे दानच करत असतो. जसे आपण पैशांचे दान करतो, धान्य किव्हा अन्य कुठल्याही वस्तूचे दान करतो. दान केल्यानंतर ते दान स्वीकारणाऱ्याने त्या दानाचे काय करावे, हा सर्वस्वी त्याचा अधिकार असतो.
तसेच काहीसे गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात आणि राज्यात होतांना दिसत आहे. एकदा का तुम्ही मतदान केले की कोण निवडून येतो, याच्याशी तुमचा काहीही संबंध नसतो. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारधारेचा आहे, कुणासोबत असेल, सत्तेत असेल की विरोधात, मंत्री होईल की नाही, तुमचे आणि तुमच्या मतदार संघातील कामे करणार की नाही, तुमच्या समस्या अडचणी सोडवणार की नाही, याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध राहत नाही.
तुम्ही ज्या उद्देशाने, भावनेने, आणि ज्या कामासाठी मतदान केलेले असते, तो उद्देश, त्या भावना आणि ते कामे होतीलच याची कसलीही गॅरंटी नसते. एका अर्थी विचार केला तर, तुमच्या मताला काहीच किंमत नसते. तुम्हीच बघा ना, सरकारचा आणि तुमचा काही तरी संबंध आहे का? एखादा कायदा नियम बनवतांना, जनकल्याणाचा (स्वकल्याणाचा) निर्णय घेतांना, राज्यकारभार करतांना तुम्हाला कधी कुणी काही विचारायला आले का? विचारणे सोडा, साधे तुमचे म्हणणे तरी कुणी ऐकायला आले का? तेही जाऊद्या, तुम्ही सरकार विरोधी काही बोलण्याची हिम्मत तरी ठेवता का? कधी तुमच्या मागे, कुठली यंत्रणा लागेल, सांगता येत नाही, बरोबर ना?
आता तुम्ही विचार करत असाल की, मी काय करू शकतो? माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे? तुम्ही म्हंटल्याप्रमाणे माझ्या मताला काही अर्थच राहणार नसेल, तर मी मतदान तरी कशाला करावं? मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी मी फॅमिली सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाईल, किव्हा मित्रांसोबत पार्टी करेल. असा विचार करून तुम्ही मतदानच करणार नसाल, तर यात आपल्या सर्वांचेच नुकसान आहे. मग मतदान नेमके कुणाला करावे, कुणाला निवडून द्यावे? हा पुढचा प्रश्न आपोआपच पडणार.
यावर माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. टी. एन. शेषण यांनी खूप छान प्रकारे समजावून सांगितले आहे. एका मुलाखतीत त्यांना विचारले की, उमेदवार कसा निवडावा. ते म्हणाले, आपण जसा आपला जावई निवडतो, मुलीसाठी किव्हा बहिणीसाठी नवरा निवडतांना आपण जशी चौकशी करतो तशी चौकशी करून आपला लोकप्रतिनिधी निवडावा. मुलाचे (उमेदवाराचे) खानदान बघावे, कुटुंब व पार्श्वभूमी (गुंड, गुन्हेगार, चोर, भ्रष्टाचारी) बघावी, तो व्यक्ती म्हणून बघावा, त्याचे शिक्षण बघावे, नोकरी (उत्पन्न) बघावी, स्वभाव ओळखावा, बायकोची (जनतेची) काळजी घेणार की नाही ते बघावे. थोडेफार अवगुण असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून लग्न (मतदान) करावे. परंतु, जास्तच अवगुण असतील तर केवळ मुलगी लग्नाची झाली म्हणून तुम्ही जबरदस्ती लग्न करत नाही. निवडणूक लागली म्हणून मतदान करायचे, असे व्हायला नको. जर एकही उमेदवार मत देण्या लायक नसेल तर काय करावे, या पुढच्या प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले की, जर तुम्हाला वेळेत कळाले, तर स्वतः निवडणूक लढवावी!
गंमतीचा भाग सोडला तर, बहुतांश ठिकाणी सर्वच उमेदवार मतदान करण्याच्या लायक नसतात. म्हणून कदाचित “नोटा” चे बटन दिलेले असते. नोटा म्हणजे, “नन ऑफ द अबाव” (वरीलपैकी कुणीच नाही). सण २०१३ पासून भारतात ही सुविधा दिलेली आहे. दीड ते दोन टक्के लोक “नोटा” चे बटन दाबून सर्व उमेद्वारांप्रति आपली नाराजी व्यक्त करतात. काही ठिकाणी विजयी आणि पराभूत उमेद्वारातील मतांच्या फरकापेक्षा “नोटा”ची मते अधिक असतात. मतदाराला त्याच्या गोपनीय मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करत, कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा अधिकार देणे, लोकशाहीत खूप महत्वाचे आहे.
राजकीय पक्षांद्वारे उभे केलेल्या उमेद्वारांबद्दल नापसंती व्यक्त करण्याचा अधिकार “नोटा” सारखा पर्याय मतदाराला देतो. याचा परिणाम असा होईल की, हळूहळू एक पद्धतशीर बदल घडेल, राजकीय पक्षांना देखील लोकांच्या इच्छेची दाखल घ्यावी लागेल. जास्तीत जास्त प्रामाणिक उमेदवार उभे केले जातील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परंतु, हे बदल केव्हा शक्य होईल? जेव्हा “नोटा” ला पडलेल्या मतांच्या संख्येचा निवडणुकीच्या परिणामांमध्ये त्याची गणना केली जाईल.
उदा. जर एक ठराविक टक्के मतदान “नोटा” असेल तर निवडणूक रद्द व्हायला हवी, किव्हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांतील मतांच्या फरकापेक्षा “नोटा” जास्त असेल, तरीही निवडणूक रद्द व्हायला हवी. आज “नोटा” ची मोजणी केवळ सांख्यिकी विश्लेषणापूर्ती मर्यादित राहीली आहे.
या वर्षीची लोकसभा निवडणूक खास आहे. गेल्या पंच्याहत्तर वर्षांपैकी बहुतांश काळ काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत होते. काही अपवादात्मक कालखंड सोडला तर सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसेतर पक्ष कधीही दुसऱ्यांदा सत्तेत आला नाही. २०१९ मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप दुसऱ्यांदा बहुमताने निवडून येऊन इतिहास घडवला होता. २०१४ च्या यशानंतर पुढील पाच वर्षात केलेल्या भरीव कामगिरीच्या जोरावर भारतीय जनतेने त्यांना दुसऱ्यांदा भरघोस मताधिक्याने निवडून दिले होते.
त्याचीच पुढे री ओढत २०२४ मध्ये लोकसभेत चारशे पार चा नारा देऊन मोदींनी या वेळी हॅट्रिक करणार असा संदेश देशाला आणि जगाला दिला आहे, असेच म्हणावे लागेल. या इलेक्शन मध्ये सर्वात बलाढ्य पक्ष म्हणून आज भाजप कडे बघितलं जात आहे. त्या खालोखाल काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रादेशिक पक्ष आपली ताकद आजमावणार आहे. ४ जूनला काय होणार आहे, हे देवालाच माहीत. परंतु, तोपर्यंत योग्य उमेदवार निवडण्यासाठी उपयोग होईल, अशी सद्यपरिस्थितीवर चर्चा करू. त्याद्वारे विश्लेषण करून आपले बहुमोल मत कुणाला द्यायचे, हे ठरवण्याचे शहाणपण आपल्यात यावे.
तुम्ही भावनिक विचार न करता, तर्काधारीत विचार करून निर्णय घ्यावा, हा माझा यामागील उद्देश आहे. आपले भविष्य, आपल्या भावी पिढीचे भविष्य, तसेच आपल्या देशाचे भविष्य आपणच लिहावे, व ते लिहीण्यासाठी आपल्याकडे मतदान रुपी लेखणी बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा योग्य वापर करून, योग्य उमेदवार निवडून, भारताला आणि परिणामी आपल्या जीवनाला योग्य दिशेला मार्गक्रमण करण्यासाठी पुढाकार घेऊया…! (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *