आदिवासी आयुक्तांना भेटायचेय? क्यूआर कोड स्कॅन करा!

जिल्ह्यात प्रथमच ई-ऑफिस प्रणालीचा वापर

नाशिक ः देवयानी सोनार
आदिवासी विकास विभागात आयुक्त लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून विभागाचा कॉर्पोरेट लूक करण्यासह कामात पारदर्शकता येण्यासाठी अनेक ई -ऑफिस प्रणाली सुरू करणारा जिल्ह्यातील पहिला विभाग ठरला आहे.
आयुक्तांना भेटण्यापासून ते कर्मचार्‍यांच्या कार्यालयीन दैनंदिनी, कामाचा आढावा, आगामी कामे यांसह ई-ऑफिस प्रणालीद्वारे भेटण्यासाठी येणार्‍या अभ्यागतांना क्यूआर कोड स्कॅन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागते.त्यानंतर वेळ दिली जाते. यामुळे कामकाजात पारदर्शकता येत आहे. भेटणार्‍यांचा वेळही वाचत आहे.
ई-ऑफिस प्रणालीद्वारे नोंदणी, कर्मचार्‍यांची हजेरी,पत्रव्यवहार,कर्मचार्‍यांच्या कामकाजाबद्दल आढावा. टास्क मॅनेजरद्वारे दिवसभराचे कामकाज, आगामी कामकाजाची नोंद, टॅली सॉफ्टवेअर आदी सर्व डिजिटल साधनांचा उपयोग करून व्यवस्थापन, फायलींची नोंद ठेवली जात आहे.
टप्प्याटप्प्याने ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भेटीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंटमुळे आदिवासीही मुख्य प्रवाहात यावे, कुठेही मागे राहू नये, हा उद्देश
आहे.
आदिवासींना आपल्या कामांसाठी वारंवार कार्यालयात यावे लागते. त्यांनाही काम सोपे व्हावे. वेळ वाचावा, कामात पारदर्शकता राहावी यासाठी ई ऑफिसचे काही डिजिटल प्रणाली वापरून तीन-चार उपक्रम सुरू केले असून, बिलांसाठी मात्र फायली येतात, असे आयुक्त बनसोड यांनी सांगितले.

इतर कार्यालयांतही वापर गरजेचा

सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली लागू करावी, जेणेकरून वेळ, माहिती साठवण, कर्मचार्‍यांकडे लक्ष, माहितीची सुरक्षा,खर्चात बचत, पारदर्शकता, उच्च कार्यक्षमता, सुधारित जलद निर्णय प्रक्रिया, कागदविरहित कामकाज, कागदपत्रांची देवाणघेवाण जलद करणे सोपे होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा नाशिकचा आदिवासी विभाग हा जिल्ह्यात पहिला ठरला आहे. इतर शासकीय कार्यालयांनीही ई-ऑफिस डिजिटल प्रणालीचा वापर सुरू केल्यास पारदर्शकता आणि कामात गतिमानता येण्यास हातभार लागेल.

ई-ऑफिस प्रणाली चांगलीच आहे. भेटीसाठी क्यूआर कोड, कर्मचार्‍यांची हजेरी कामकाजाचा आढावा, ई-ऑफिसमुळे एक पायरी कमी करू शकलो. या वापरामुळे कामात गतिमानता आली आहे. सर्व आदिवासी विभाग हायटेक झाला आहे.
– लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *