लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या शतकात संतांचे संत ज्ञानेश्वर माउलींनी सामाजिक समतेच्या पायावर भागवत धर्माची उभारणी केली. पुढे नामदेव, एकनाथ, तुकाराम व इतर सर्वच बहुजन समाजातील संतांच्या मांदियाळीने ती इमारत पूर्णत्वास नेली. ज्ञानेश्वर माउलींनी सुरू केलेली आषाढीवारीची आज 21 व्या शतकातील विज्ञान युगात नियमित त्याच उत्साहाने व विठुमाउलीवरील आंतरिक श्रद्धा, निष्ठा भावनेने सुरू आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक, तंत्रज्ञानाने भौतिक प्रगती विकास होऊन ऐहिक सुखाची प्राप्ती झाली तरी मानसिक अशांतता, ताणतणावाची व्याप्ती वाढली आहे. त्यावर उपास्य देवतेवर श्रद्धा हाच उपाय आहे. विठ्ठलाचे उपासक वारीत सहभागी होतात व तेथील दिव्य अनुभव घेत मानसिक शांती, समाधान व निर्मळ आनंद प्राप्त करतात म्हणून वारींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
वारी ही विशाल समाजमनाची परमेश्वरावरील भक्तिभावनेचे द्योतक असते, तसेच पुढील तत्त्वांचा आविष्कार दर्शविते.
1) समतेचे तत्त्व : जात, धर्म, पंथापलीकडे माणसातील देवत्व ओळखून समभाव प्रस्थापित करणे.
2) ध्येय गाठण्यासाठी बिकट वाटेवरून वाटचाल करणे.
3) पठण, गायन, नामस्मरणाने देवास भजणेे.
4) टाळ, चिपळ्या, मृदंग, एकतारी या संगीत साधनेतून देवास संतुष्ट करणे.
5) फुगडी, नृत्य, रिंगण या क्रीडाप्रकारात रममाण होऊन ताणतणाव विसरणे व निकोप आनंद प्राप्त करणे.
6) नीती, चारित्र्याचे संवर्धन म्हणजे विठ्ठलभक्ती.
7) स्वतःसाठी काहीही न मागता सकल मानव समाजाच्या कल्याणासाठी देवास साकडे घालणे.
8) आई-वडील, अतिथी व गुरू यांचा मान राखणे.
9) अनाथ, अपंग, दीनदुबळे, रंजले-गांजले यांसी आपुले समजून मदत करणे.
ज्ञानेश्वर माउलींनी अशी ही वारीप्रथा सुरू करून शुद्ध भक्तिभाव, समता, एकता, ममता आचरणशीलता, विनयशीलता व अहिंसा ही तत्त्वेे प्रस्थापित केली.
वारीची ध्येयपूर्ती
एकादशीच्या शुभमुहूर्तावर भूलोकीचे वैकुंठ पंढरपूर येथील चंद्रभागेत स्नान करून सावळे परब्रह्म विठ्ठलाचे व रखुमाईचे दर्शन घ्यायचे व कृतकृत्य व्हायचे या ध्येयाने प्रेरित झालेले लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात.
पांडुरंग दाता । पांडुरंग त्राता ।
जीवन नियंता। पांडुरंग ॥
या दृढभावाने, प्रचंड आत्मविश्वासाने व अटळ निर्धाराने प्रेरित झालेले, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून सर्वसामान्य असंख्य माणसे आपल्या जथ्याबरोबर विठूच्या ओढीने मैलोन् मैल पायी अंतर काटत, थंडी-ऊन-पावसाची पर्वा न करता चालत असतात.चालताना टाळ-चिपळ्या, मृदंग, वीणा वाजवत विठ्ठलाचे अभंग ओवी, भजन गात, विठुनामाचा गजर करत,
फुगड्या, रिंगण यात तल्लीन होत पुढे मार्गस्थ होत असतात. संध्याकाळी सोयीस्कर ठिकाणी मुक्काम पडतो. या दिनक्रमात वेदनांचा विसर पडतो. वारींचे वैशिष्ट्य असे की, विविध जात, पंथ, धर्माची गरीब, मध्यम व श्रीमंत वर्गाची माणसे “भेदाभेद अमंगळ“ हे तत्त्व अंगीकारून ‘सर्वांभूती ईश्वर‘ या विचारसरणीने मार्गक्रमण करत असतात. म्हणून आषाढीवारी ही समानतेची शिकवण देणारी एकात्मतेची जपनुक करणारी पाठशाळा आहे.
अशा या भोळ्याभाबड्या भाविकांना, विठूच्या लेकरांना पंढरीच्या राणाकडून कोणत्याही ऐहिक सुख, विलास, भोगाची अपेक्षा नसते. तनमनाला सुखावणारे, सारे अष्टसात्त्विक भाव जागे करणारे, विलक्षण शांती देणारे पांडुरंगाचे दर्शन हीच त्यांची अंतिम ध्येयसिद्धी असते.आपल्या लाडक्या विठुमाउलींवर अपेक्षेचा भार न टाकता त्याच्या तेजोमय रूपाशी तादात्म्य पावणे, हेच त्यांच्या वारीचे उद्दिष्ट असते. ही सारी संस्काराची शिकवण त्यांना कोणी दिली तर यच्चयावत संतांच्या मांदियाळीने दिली आहे.
हेचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा।
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ।
न लगे मुक्ति, धनसंपदा ।
संत संग देई सदा ।
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हांसी ॥
– संत तुकाराम