नवीन नाशिक, पूर्व विभागात काम
नाशिक : प्रतिनिधी
नवीन नाशिक व नाशिक पूर्व विभागातील रस्त्यांच्या दुतर्फा व रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागा, शाळा, जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी सहा हजार रोपांची लागवड करून संरक्षक जाळ्या लावल्या जाणार आहेत. यासाठी अडीच कोटींचा खर्च येणार असून, उद्यान विभागाने महासभेवर प्रस्ताव ठेवला आहे.
नवीन नाशिक व नाशिक पूर्व विभागातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा व रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागा, शाळा, जॉगिंग ट्रॅकमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहेत. वड, पिंपळ, बहावा, अर्जुन, पांगारा, काटेसावर, चिंच, ताम्हण, करंज, आंबा, सीता अशोक, कांचन, कैलासपती व चाफा यांसारख्या भारतीय प्रजातीच्या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रस्तावित वृक्षलागवड करण्यासाठी व लागवड करण्यात येणार्या रोपांचे संगोपन करण्याकामी आवश्यक चतुर्थ श्रेणी कर्मचारीवर्ग, तसेच साधनसामुग्री विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कामाची आवश्यकता लक्षात घेता, पावसाळ्यात प्रस्तावित वृक्षलागवड व लागवड करण्यात येणार्या रोपांचे पुढील तीन वर्षांकरिता संगोपन मक्तेदार एजन्सीमार्फत करण्याची आवश्यकता असल्याने या कामाचे प्राकलन तयार करण्यात आले.
दरम्यान, उद्यान विभागाकडून दरवर्षी रस्त्यांमधील दुभाजकांत विविध रोपे लावली जातात. त्यावर लाखोंचा खर्चही केला जातो. मात्र, कालांतराने ती रोपे करपून जातात. मात्र, ठेकेदाराला त्याचे देयकअदा केले जाते. याकडे उद्यान विभाग लक्ष देणार की नाही? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, महापालिका हद्दीत राज्याच्या प्रधान सचिवांनी एक लाख रोपांची लागवड करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्याद़ृष्टीनेही उद्यान विभागाने नियोजन सुरू केले आहे.