अतिरिक्त आयुक्त नायर : गोदावरी उपसमितीच्या बैठकीत सूचना
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी व तिच्या उपनद्या प्रदूषणासंदर्भातील मलनिस्सारणविषयक बाबी, एसटीपी प्लांट, डी-काँक्रिटीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी, निळी पूररेषा मार्किंग करण्याबाबत तसेच इतर नदी प्रदूषणासंदर्भातील विषयांवर तसेच औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी नद्यांमध्ये सोडण्यात यावेत. तसेच शहरातून ज्या उपनद्या आहेत, त्यांना फेब्रिकेशनच्या जाळ्या बसवण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी केल्या.
विभागीय आयुक्त यांचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबत दरमहा उपसमितीची बैठक घेण्यात येते. मंगळवारी (दि.13) सदर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नायर यांनी गोदावरी प्रदूषणाबाबत विविध सूचना दिल्या. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत सर्व शासकीय इमारती यांचा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. शहर अभियंता संजय अग्रवाल, गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त नितिन पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अजित निकत, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिकांत पगारे उपस्थित होते. गोदावरी प्रदूषणाच्या अनुषंगाने प्राप्त होणार्या तक्रारींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. घनकचरा विभागाने सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत नदी स्वच्छतेचे काम सुरू केले असून, प्लास्टिक बंदीबाबत समिती गठित करण्याच्या सूचना नायर यांनी दिल्या.