नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आढळले पाणमांजर

2018 नंतर प्रथमच वावर; जगात 13 पैकी 3 जाती भारतात

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सन 2018 नंतर प्रथमच पाणमांजर आढळून आले आहे. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात प्रथमच बीडबीमुस्टिलिडी कुळातील स्तनी वर्गाचा हा प्राणी आढळला आहे. बिळामध्ये किंवा दगडांच्या खाचांमध्ये घर बनविणार्‍या या प्राण्याच्या जगात 13 जाती आहेत. त्यात भारतात तीन जाती आढळतात. पाणमांजरे आपले भक्षक प्रामुख्याने नदीतील मासे, खेकडे, बेडूक, पाण्यातील साप पकडून खातात. ते बिळांमध्ये राहण्याची व्यवस्था स्वतः करतात. या मांजरी बर्‍याचदा किनार्‍यावरील दगडांच्या मोठ्या खाचांमध्येही आपले घर बनवतात.
नदीत किंवा तलावामध्ये मोठ्या चपळतेने माशांचा पाठलाग करतात व त्यांची शिकार करतात. पाणमांजर सहसा कोणाच्याही हाती लागत नाही. पाणमांजर खूपच हुशार असते. पाणमांजरदेखील नदी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिची कातडी गुळगुळीत असते, तसेच हे पाणमांजर सर्वांत मोठे असून, त्याचे वजन सात ते अकरा किलो असते. या मांजराची लांबी एक ते दीड मीटर असते, तसेच शेपटी 45 सेंटिमीटर लांब असते. त्याच्या पाठीवर केस असून, ते मऊ असतात. तसेच या पाणमांजराचा रंग पिवळट तपकिरी असतो. पोटाकडे तो फिकट करडा असतो.
त्याच्या तोंडावर केस नसतात. शरीर लांब व निमुळत्या आकाराचे असते, पण मांजराचे पाय व पंजे मजबूत असतात आणि बोटांना नखे असतात. त्यांच्या पायाचा उपयोग पोहण्यासाठी करतात.
पाणमांजर पाण्यात उडी मारल्यानंतर तीन ते चार मिनिटे पाण्यामध्ये राहू शकतात. हे प्राणी शिट्टी मारल्यासारखा आवाज काढतात. भारतात युरेशियन पाणमांजर आढळते. तसेच छोटे पाणमांजरसुद्धा आढळतात. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर ते
फेब्रुवारीदरम्यान असतो. या महिन्यांत मादी एका ठिकाणी स्थायिक होतात. मादी एका वेळेस दोन ते पाच पिल्लांना जन्म देतात. त्यानंतर नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ राहतो. एका वर्षानंतर पिल्ले स्वतंत्र राहू लागतात. पाणमांजराचे आयुष्य चार ते दहा वर्षे असते.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पाणमांजर आढळणे येथील समृद्ध जैवविविधता आणि चांगल्या परिसंस्थेचे प्रतीक आहे. या हंगामात दुसर्‍यांदा पाणमांजराचे दर्शन झाले आहे. भारतात 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना पूर्णपणे संरक्षण दिले आहे.
– हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर

Water cat found in Nandurmadhyameshwar Sanctuary

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *