त्र्यंबकेश्वरला आज पुन्हा पाणीबाणी

नियोजनाचा दुष्काळ; 18 वर्षांपासून पाणीटंचाईचा फेरा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
दक्षिण भारताला सुजलाम् सुफलाम् करणार्‍या गोदावरीच्या उगमस्थानी सोमवारी (दि. 8) पाणीबाणी निर्माण झाली आहे. मागच्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नळाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, तर आता पाइपलाइन फुटल्याने सोमवारी शहरात पाणी येणार नाही. उन्हाळ्यात दोन दिवसांतून एकदा 35 मिनिटे पाणी मिळते. त्यातही अधूनमधून वीजपुरवठ्याचे कारण देत तीन दिवसांतून एकदा म्हणजेच आठवड्यात दोन वेळा पाणी मिळते. आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यातदेखील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होताना दिसतो. यामागे नियोजनाचा दुष्काळ असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे.
त्र्यंबकेश्वर शहराला अहिल्या, अंबोली व गौतमी बेझे या तीन जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या तिन्ही योजनांचे वीजबिल आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी महिन्याकाठी 15 लाख रुपये खर्च होतात. जानेवारीपर्यंत अहिल्या धरणात व मे महिन्याअखेरपर्यंत अंबोली धरणात पाणी असते. गौतमी बेझे धरणात तर पुढची दोन वर्षे पुरेल इतका राखीव पाणीसाठा असतो. मात्र, तरीदेखील त्र्यंबकवासीयांना सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच येथे येऊन गेले आहेत. त्यांनी भाषणात पाणीपुरवठ्याबाबत भाष्य केले. तसे यापूर्वीदेखील येथे 12 महिने 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या वल्गना झालेल्या आहेत. मात्र, या पोकळ घोषणांनी त्र्यंबकवासीयांची तहान भागलेली नाही. सिंहस्थासाठी हजारो कोटींच्या विकासकामांची घोषणा केली जात आहे. विकासकामांसाठी इमारती तोडणे, स्थलांतर करणे यासह वृक्षतोड, जमिनी ताब्यात घेणे असे समाजमनाला विचलित करणारे प्रकार घडत आहेत. मात्र, या सर्वांना त्र्यंबकेश्वर येथील मागच्या 18 वर्षांपासून सुरू असलेला पाणीटंचाईचा फेरा दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडला. आभाळातल्या पाण्याने अतिवृष्टी आणि पूरस्थिती नियमित झाली आहे. मात्र, तरीदेखील नियोजनाच्या दुष्काळाने त्र्यंबकवासीय होरपळत आहेत. सलग 48 तास नळाला पाणी येत नाही.
अगोदरच्या दिवशी अर्धा -पाऊण तास आलेले पाणी जपून कसे वापरायचे ते समजत नाही. तशात तांत्रिक बिघाडाने दररोजच्या नियमित वेळेत नळाला पाणी सोडता आले नाही तर ते दिवसभरात पुन्हा सोडण्याची तसदी पाणीपुुरवठा विभाग घेत नाही. थेट दुसर्‍या अथवा तिसर्‍या दिवशी ठरलेल्या वेळेत नळाला पाणी येणार असा अलिखित नियम झाला आहे. नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग गेल्या 24 वर्षांत नियमित व अव्याहत सेवा देण्यात अपयशी ठरला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी गप्प असल्याने नागरिक हवालदिल आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *