इगतपुरीतील धरणांचा जलसाठा खालावला

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; पाणीटंचाईला जबाबदार कोण, नागरिकांचा प्रश्न

अस्वली स्टेशन : वार्ताहर
पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे सावट दिसत आहे. इगतपुरी तालुक्यात लहान-मोठी 12 धरणे आहेत. त्यातील जलसाठा खालावला आहे. या पाणीटंचाईला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

दारणा धरणात 35.65, भावली 21.65, भाम 13.14 टक्के, तर कडवा धरणात साडे सोळा टक्के जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यात उन्हाळ्याची कोरडी छाया नागरिकांची तडफड वाढवत आहे. पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे.
इगतपुरीच्या धरणातील हक्काचे पाणी असताना अन्य तालुक्यातील मोठे राजकारणी ते काढून नेतात. मात्र तालुक्यातील राजकारणी आवाज उठवताना कधी दिसत नसल्याचे चित्र आहे. इगतपुरीच्या पाणी टंचाईला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत. तालुक्यातील धरणे, नदीपात्र कोरडी झाल्याने शेतकर्‍यांची पिके कोमेजली आहेत. वाड्यापाड्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींनी पाणीटंचाईबाबत प्रशासनाला मागणी करून उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
पाण्याअभावी काही शेतकर्‍यांची पिकेही सुकून गेली आहेत. तालुक्यातील लहान मोठ्या धरणांची पातळी खालावली असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता धरणाच्या तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाई यावर चर्चा, बैठका, नियोजन अद्याप झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. पाणीबचतीसाठी कठोर धोरण अवलंबवावे लागणार आहे. पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाच्या तापमानामुळे मका पिकाचा पाचोळा झाला आहे.
पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यावाचून तहानेने व्याकुळ होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सूर्य आग ओकत असून, उन्हामुळे सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाल्याचे दिसते.
कोपरगाव येथील पाण्याची निकड ओळखून इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातील पाणी कोपरगावला सोडण्यात आले. अकाली सोडलेले आवर्तन इगतपुरी तालुक्याला लाभदायी ठरलेले नसून, शेतात उभ्या पिकांची चिंता ठाकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *