रस्त्यांवर पाणी साचता कामा नये

अतिरिक्त आयुक्त नायर यांच्या सूचना; शहरात ठिकठिकाणी पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
अवकाळी पावसातच महापालिकेचे पितळ उघडे पडून शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले. दरम्यान, याप्रकरणी नागरिकांकडून महापालिकेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. बुधवारी (दि.14) महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी केली. कुठे-कुठे जास्त पाणी साचते, याची प्रत्यक्ष पाहणी करून नायर यांनी अधिकार्‍यांना तत्काळ त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने धुडगूस घातला होता. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्याने रस्त्यावर कुठेही पाणी साचले नाही. आयुक्त मनीषा खत्री या विदेश दौर्‍यावर गेल्या असून, त्यांच्याकडील पदभार अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नायर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, बांधकाम विभागाचे शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह शहरात पाहणी केली. पावसामुळे शहरातील विविध भागांत रस्त्यांवर पाणी साचत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. नालेसफाईचा मुहूर्त न लागल्याने चेंबर तुंबून पाणी थेट रस्त्यांवरून वाहत आहे.
राजीव गांधी भवन, शालिमार, सीबीएस, मेन रोड, कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका, द्वारका, शरणपूर रोड, सावरकरनगर आदींसह परिसरात पाणीच पाणी साचत आहे. बुधवारी अतिरिक्त आयुक्त नायर यांनी अधिकार्‍यांना याप्रकरणी तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. ज्या ठिकाणी पाणी साचत आहे, तेथे जाऊन
पाहणी केली.
नागरिकांना त्रास होऊ नये, याकरिता उपाययोजना कराव्यात. महापालिकेच्या यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना देऊन नालेसफाई, पंपिंग यंत्रणा आणि आपत्कालीन सेवांचा आढावा घेण्याचेही  निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी त्र्यंबक रोडवरील सावरकर जलतरण तलाव येथे पाहणी केली. जलसंचयन व स्वच्छतेबाबत प्रशासनाला सूचना केल्या. चेंबर तुंबल्याने दुगर्र्ंधीयुक्त पाणी बाहेर पडत असल्याने नागरिकांना याचा त्रास होतो आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नालेसफाई वेगाने करण्याच्या सूचना  त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *