खासदारांचा कठोर पवित्रा; मूलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रशासनास आदेश
चांदवड ः वार्ताहर
तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील राजदेरवाडी, इंद्रायणीवाडी आदी वस्त्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज आणि पाण्याची मूलभूत सोय नसल्याने रहिवासी जीवन कष्टमय व्यथित करत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी राजदेरवाडी ग्रामपंचायत सभागृहात तातडीची आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आणि दोन्ही गावांसाठी तातडीने वीज व पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे कठोर आदेश दिले.
बैठकीत खा. भगरे यांनी हात्याड धरणाच्या कामाला झालेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “हे धरण माझ्या पूर्वीच्या प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रखडले. सध्या सत्तेत नसतानाही संबंधित नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे.” राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडीतील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. पिण्याच्या पाण्याची आणि विजेची सोय नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर आणि दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होत आहे. केदाबाई अनिल गोधडे या आदिवासी महिलेने सांगितले की, लाईट आणि पाणी नसल्याने आमच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यावे?, असा प्रश्न उपस्थित केला. स्थानिक नागरिक शहू शिंदे आणि दादाजी हरी जाधव यांनी, राजदेरवाडी हे नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असूनही येथे पडणार्या मोठ्या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जात नाही. पाणी वाहून जाते, त्यामुळे छोटे बंधारे बांधल्यास पाण्याची समस्या सुटू शकते, असे सांगितले. ग्रामस्थ जगन यशवंत यांनी या भागातील शासकीय सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले. 2003-04 पासून वनजमिनीवर राहणार्या अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वनवासी कुटुंबांना आजही शाळा, दवाखाना, अंगणवाडी आणि स्वस्त धान्य दुकानासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या त्रुटी तातडीने दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विकासाची पहाट होण्याची शक्यता
खा. भगरे यांनी प्रशासनाला तत्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने या दुर्गम भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता विकासाची आणि सोयीसुविधांची पहाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून या आदेशांची अंमलबजावणी किती जलद गतीने होते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.