प्रौढ प्रताप पुरंदर, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधीश्वर, राजाधिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, जय! श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा विनम्र मुजरा!
ज्या महाराजांनी मराठी मुलखाच्या स्वातंत्र्यासाठी, यवनांच्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी, आपले सुराज्य स्थापन करण्यासाठी सर्व मराठी जनांना एकत्र आणलं, त्यांच्यात एकी घडवली, त्यांचीच जयंती साजरी करताना समाज तारखे प्रमाणे साजरी करणारे आणि तिथीनुसार साजरे करणारे अशा दोन गटांत विभागला जाणे म्हणजे केवढा तो दैवदुर्विलास! इथंपासूनच महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांचा, शिकवणीचा अनादर करण्याची आपली सुरवात होते ती थेट शिवजयंतीनिमित्त रात्री-बेरात्री मोठमोठ्या आवाजात डीजे लावण्यापर्यंत जाते.
कोण देतो तो अधिकार आपल्याला? रस्ते अडवण्याचा, रस्त्यावर कमानी उभारण्याचा, तासन्तास चालणार्या मिरवणुका काढण्याचा, त्यासमोर बीभत्स नाचण्याचा,अमाप पैसे खर्च करण्याचा आणि त्यासाठी दमदाटी करून वर्गणी गोळा करण्याचा? हे सर्व करत असताना आपण महाराजांचा अपमान करत आहोत हे कोणाच्याच मनात का येत नाही? उत्सवात प्रत्येकात उत्साह असणं स्वाभाविक आहे, पण उन्माद असता नये, हल्ली तोच प्रकर्षाने जाणवतो! तोच उन्माद स्वतःच्या भाषेबद्दल, जातीबद्दल, धर्माबद्दल जो रास्त अभिमान असायला हवा त्याला दुराभिमानात परावर्तीत करतो.
महाराजांच्या सैन्यात, मंत्रिमंडळात अठरापगड जातीचे, जमातीचे, धर्माचे लोक होते. त्यांच्यात सलोखा होता, एकोपा होता, प्रेम होतं. कारण महाराजांनी कधीही जातीधर्मात तेढ निर्माण होऊ दिली नाही, पण आताचे राज्यकर्ते नेमक तेच करतात
स्वतःच्या स्वार्थासाठी. संत, महात्मे, थोर व्यक्ती हल्ली सर्वांनी वाटून घेतले आहेत, अगदी देवदेखील आणि झालंच तर रंगसुद्धा! हल्ली शिवजयंती म्हणजे फक्त आणि फक्त एक इव्हेंट झाला आहे. काय बोलावं आणि काय लिहावं कोणीही त्याच्यावर विचारच करत नाही. पहिली शिवजयंती कधी व कोणी साजरी केली माहीत आहे का कुणाला? ही गोष्ट आहे 1870 सालची. महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर झाडाझुडपानी झाकलेली होती व लोकांच्या आठवणीतूनही महाराज हळूहळू हरवत चालले होते, तेव्हा महात्मा जोतिराव फुले यांना हे सहन झाले नाही. ते रायगडावर गेले. त्यांनी तिथे साफसफाई केली व त्या पवित्र समाधीची जनतेला आठवण करून दिली. त्यावेळेस रायगडावर पहिली शिवजयंती साजरी केली गेली. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा पहिला पोवाडा लिहिला आणि दिली महाराजांची एक अमर ओळख, कुळवाडीभूषण या नावाने. म्हणूनच इतिहास सांगतो शिवरायांना जनतेच्या हृदयात पुन्हा जागवण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. आजच्या पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवण्याचं काम पोवाड्यांनी किती सोपं केलं आपण इयत्ता चौथीला असताना इतिहास म्हणजेच महाराज अशीच आमची इतिहासाची ओळख झाली….
लहानपणी शिवजयंती म्हटले की, सर्वत्र पोवाडे ऐकू यायचे, खूप प्रसन्न वाटायचे त्यांचे विचार ऐकून. मनात एक ऊर्जा निर्माण व्हायची, पण आता तीच एक शोकांतिका वाटते माहिती आहे का? कारण शिवजयंतीनिमित्त सर्वत्र डीजे आणि जल्लोष, गोंगाट आणि महाराजांच्या समोर काय तर आता जाऊद्याना घरी वाजले की, बाराअसे गाणे वाजवले जाते. काय संस्कार, वारसा देत आहोत आपण पुढच्या पिढीला? खूप खूप दुःख होते मनाला हे सगळं बघून. विचार येतो की वयाच्या सोळाव्या वर्षापासून महाराजांनी गडकिल्ले जिंकले, बलाढ्य मुघलांना आव्हान दिले अगदी मूठभर मावळे हाताशी असताना. त्यासाठी त्यांचात ताकद होती, मनगटात बळ होतं, निधडी छाती होती, अन्याय बघून रक्त पेटून उठत होतं! यापैकी कोणता गुण आहे हल्लीच्या तरुणांत? पाच इंचाची छाती, बुडाखाली बाइक, तोंडात गुटख्याचा तोबरा आणि तो पचापच कुठेही थुंकायची गलिच्छ सवय, मनगटापेक्षा हाताचा अंगठाच सशक्त झालेला मोबाईल चालूवन चालवून! महाराजांच्या गडावरदेखील एक पिकनिक म्हणून जातात, प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढणं, दारू पार्ट्या करणं, गडाच्या तटबंदींवर आरपार बाण गेलेले बदाम काढणं, यामुळे त्या पवित्र स्थानाची आपण विटंबना करतो आहोत याचं भान नसतं त्यांना.
फक्त गडांवर सेल्फी नको, गडकिल्ले ही आपली मंदिरे आहेत, तिथे जाऊन धिंगाणा, धुडगूस घालणं किंवा अजून कचरा करणे शोभत नाही. त्याऐवजी गडावर पडलेला कचरा उचलणे असे केले तर ती हजार घोषणांपेक्षा मोठी सेवा आहे. अहो शिवजयंती साजरी करा, पण महाराजांचे विचार स्वतःत रुजवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. साध्या साध्या गोष्टी अमलात आणल्या तर ती खर्या अर्थाने साजरी झाली असं म्हणता येईल. महाराजांच्या राज्यात स्त्रियांचा आदर होता. मुलींना सुरक्षित वाटेल असे वागा. सर्वार्ंत महत्त्वाचे रोजच्या आयुष्यात प्रत्येक स्त्रीचा आदर करा. महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आपणही नुसते झेंडे न फडकवता स्वतःच्या पायावर उभे राहायलाच हवे. स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आजचे स्वराज्य हा सुविचार वर्षाचे 365 दिवस जपा. त्यांची जयंती फक्त एक दिवस नाही तर 365 दिवस अशा प्रकारे साजरी करा जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करून. तीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल!
We want celebration, not hysteria!
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…