शाळा प्रवेशोत्सवासाठी नामदार, आमदार, अधिकारी, अन्य लोकप्रतिनिधींची असणार उपस्थिती
निफाड ः विशेष प्रतिनिधी
शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी (दि. 16) होणार आहे. यानिमित्त पहिल्या व दुसर्या दिवशी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. यात संबंधित क्षेत्रातील मंत्री, आमदार अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी होणार असून, ते विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी यावर्षी दत्तक शाळा योजनाही राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा शासकीय अधिकार्यांनी दत्तक घ्यायच्या आहेत. या शाळांना वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी वर्षभर भेट देतील. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या गरजांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करतील. या शाळा भेटींचे नियमित अहवाल संबंधित अधिकार्यांनी सादर करणे अनिवार्य आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने विशेष प्रचार मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पालकांना शाळांमध्ये उपलब्ध सुविधा, शिष्यवृत्ती योजना व उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे.
इयत्ता पहिलीच्या प्रवेशावर जादा भर दिला जाणार आहे. इयत्ता पहिलीच्या प्रवेशात वाढ करण्यावर हा भर असेल. यासाठी शाळा, तालुका व जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. संबंधित अधिकारी, शाळा प्रशासन हे समन्वयाने हे कार्य यशस्वी करणार आहेत.