पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले
नेमके काय कारण घडले?
सिडको : विशेष प्रतिनिधी
सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कलेक्शनच्या वर्चस्वावरून चांगलीच धुमश्चक्री उडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वादग्रस्त रजपूत आणि गोपनीय शाखेतील कर्मचारी पाटील यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर थेट हाणामारी झाली. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेतील शिस्त व कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सरकार वाडा पोलीस ठाण्यात रजपूत आणि पाटील यांच्यात वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, मात्र काही क्षणांतच हा वाद हातघाईवर गेला. दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, कपडे फाडले आणि संपूर्ण पोलीस ठाण्यात गोंधळ उडवून दिला. घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले व त्यांना वेगळे केले.
या प्रकरणात प्रभारी अधिकारी तातडीने ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित दोघांना समज दिली. मात्र, वाद इतका पेटलेला होता की, वरिष्ठांसमोरही त्यांनी एकमेकांवर आरोप करत भाष्य केले. अखेर शांतता राखण्यासाठी दोघांनाही घरी पाठवण्यात आले.
शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस ठाण्यांतच अशा घटना घडणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे. या घटनेमुळे कलेक्शनच्या वर्चस्वावरून पोलीस ठाण्यांत अंतर्गत कुरबुरी असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलीस आयुक्त कर्णिक या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरीत्या धंद्याना परवानगी देणे किंवा चालु धंदा बंद करणे यासह विविध अवैधरीत्या सुरु असलेल्या धंदेचालकांकडुन वसुली अर्थात कलेक्शन करण्यासाठी सर्वच पोलिस ठाण्यात कलेक्टर म्हणजे सुभेदार असतो आणि ही सुभेदारी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मर्जीतील पोलिस कर्मचार्यांकडे दिली जाते ही सुभेदारी मिळविण्यासाठी पोलिस कर्मचा-यांमध्ये मोठी चढाओढ लागते यातच पुर्वीचा सुभेदार किती कलेक्शन करतो त्यापेक्षा डबल कलेक्शन देऊ असे सुद्धा सांगितले जाते आणि हिच सुभेदारी मिळविण्यासाठी दोन कलेक्टर अर्थात सुभेदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती