आस्वाद

चाकोल्या…

काही गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही. खरंतर काही रूढी-परंपरांशी आपण भावनिकरीत्या जोडलेलो असतो.
होळीच्या आठ-पंधरा दिवस आधीपासूनच तयारी सुरू व्हायची. घरामागच्या अंगणाला लागून गोठा होता. भर दुपारी आम्ही बहीण-भाऊ एक मोठा जुना लाकडी पाट घेऊन त्यावर शेणाच्या चाकोल्या थापत असू. बोटांच्या मदतीने त्रिकोणी, चौकोनी किंवा गोल आकार दिलेल्या चाकोलीच्या मधोमध छिद्र करून त्या कडक उन्हात वाळायला ठेवायचो. प्रत्येक घरातील बच्चेकंपनी, एखादं फार जोखमीचं काम आपल्याकडे आलंय अशाच आविर्भावात हा उपक्रम पूर्ण करायची.
वाळलेल्या चाकोल्या सुतळीत ओवून त्याच्या माळा केल्या जायच्या. गोठ्याच्या भिंतीला असलेल्या खुंटीवर एक-एक करत होळीपर्यंत विविध आकारांच्या आणि कलाकृतींच्या कित्येक माळा जमा व्हायच्या. प्रत्येकाच्या माळा आपापल्या खुंटीवर वेगळ्या असायच्या. तुझ्यापेक्षा मी जास्त केल्या, अशी आमची कुरबुर होईल हे आईला आधीच ठाऊक असे; त्यामुळे ती आम्हाला आधीच वेगवेगळ्या खुंट्यांवर माळा अडकवायला सांगायची.
आठवडाभर आधीपासूनच दुकानात लाल-हिरव्या रंगाच्या पुड्या आणि रस्त्यावर पाहुणचाराला आलेली रंगांची उधळण करणारी दुकानं पाहून घरी रोज हट्ट धरला, तरी होळीच्या दिवशीच रंग विकत घ्यायची परवानगी मिळायची. रंगपंचमीच्या आधीच ’पोट्टे’ रंगून येतील, हे आईला चांगलंच ठाऊक होतं. रंगबिरंगी टोप्या, भोंगे, गॉगल आणि केसांचे टोप-सगळं वातावरण कसं ’कलरफुल’ व्हायचं!
रंगाच्या किंवा किराणा दुकानात गाठीच्या लड्या टांगलेल्या असायच्या. जिथे लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी शेजारी आवर्जून कागदात बांधून गाठी आणून द्यायचे. तिथेही वयाची मर्यादा होती-म्हणजे फक्त पाच वर्षांपर्यंतची मुलं यासाठी पात्र असायची.
लक्षमबाईच्या (लक्ष्मीच्या) देवळाजवळ मोठी होळी पेटायची. देऊळ लक्ष्मीचं होतं, पण सगळे ’लक्षमबाई’च म्हणायचे. होळीसाठी गोळा केलेल्या लाकडांभोवती या माळा अर्पण करून शुद्ध मनाने प्रार्थना केली जायची- होळीच्या पवित्र अग्नीत दुःख, निराशा आणि वाईट शक्तींचे दहन होऊ दे… सुख, शांती व समृद्धी लाभू दे. खरं तर, होळीच्या सणात आपला इतका मोठा सहभाग आहे, यातच फार मोठेपण वाटायचं. थोडीशी राख चिमटीत उचलून कपाळाला लावल्याने आणि उरलेली तोंडात टाकल्याने रोगराई जाते, असं आम्ही ऐकलं होतं.
दुसर्‍या दिवशी धुळवड म्हणजेच रंगपंचमी! सकाळी उठल्यावर चहा-दूध झालं की आई आधी हातापायाला खोबरेल तेल चोपडायची. माझ्यासाठी एखादा जुना बाजूला काढलेला फ्रॉक आणि भावासाठी मनिला पॅन्ट काढून ठेवलेली असायची. नुकताच घरी टी.व्ही. आला होता-आयताकृती शटरचा! त्याला ठेवण्यासाठी भिंतीत अगदी त्याच्याच मापाचा एक कोनाडा करून घेतला होता.
काही दिवसांपूर्वीच ’चित्रहार’ किंवा ’रंगोली’मध्ये रंगपंचमीची गाणी बघितल्यामुळे आमचं ज्ञान वाढलं होतं. मनात यायचं, रंगपंचमीला पांढरेच कपडे घालायचे असतात, मग आई असे रंगीत आणि जुनाट कपडे का काढून देते? कदाचित आपल्याकडे पांढरा फ्रॉक नाही म्हणून असावं. पण कपडे खराब होतात, तरी टी.व्ही.मधले लोक असे शुभ्र कपडे का घालतात? मग त्यांच्याकडे जुने कपडे नसतील, असं म्हणत आम्ही खिदळत विषय आटोपता घ्यायचो. दार अर्धवट लावून, दाराच्या आडोशाला उभं राहून गल्लीतून मुलं जाताना दिसली की रंगाच्या पाण्याचे भरलेले डबे किंवा बादली त्यांच्या अंगावर ओतायची! एकदा बाहेर निघालो की दुपारी बारा वाजेपर्यंत घरचं तोंड बघायचं नाही. खेळून परत आल्यावर आई अक्षरशः ’रिन’ साबण लावून आणि वेळ पडली तर कौलाच्या खापराने घासून-घासून आम्हाला स्वच्छ करायची. जेवण झालं की दुपारी गाढ झोप लागायची.
शेणाने माखलेले हात, त्या चाकोल्या आणि कधीच न उतरणारा मनावर चढलेला आठवणींचा रंग… आजही काळजात साठलेला आहे.

Wheels…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago