कथामालिका भाग ३
अंतरीचा आवाज
– सविता दरेकर
आणि एक दिवस अचानक….माझी मोठी बहीण आक्का रुममध्ये आली…मला मुलीच्या कपड्यात बघून ती रागाने जरा लाल झाली…
मी पटकन पलंगावर जावून चादर अंगावर ओढली…
आता मी घाबरलो होतो..
आक्का काय करेन माहिती नव्हते..
चिडून बोलेल किंवा धपाटे ओढेन किंवा आईसह घरात सगळ्यांना सांगेन कि,
मी अभ्यासाच्या नावाखाली रुममधे मुलींचे कपडे घालून आरशात बघत बसतो …
मला कळेना आता काय करावं…
आक्काशी नजरानजर होताच मी रडू लागलो..पण आक्का मायेने जवळ आली आणि रागाने चादर ओढली..
मला जवळ घेत चिडली व मला म्हणाली..कि
“दिपक हे असं का करतोस तू ?
हे चांगलं नाही,कळतंय का तुझं तुला…
तू पुर्णतः चुकीचं वागतोय दिपक..!
पण माझ्याकडे तिच्या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते…
माझं मलाच कळत नव्हतं मी असं का वागतोय…!
मला मुलीसारखं रहाणं का आवडतय? मलाच हे कोडं उलगडत नव्हतं. तर चौदा पंधराव्या वयातला मी काय उत्तर देणार होतो हा प्रश्नच…?
फक्त शांत बसून रडत राहीलो…!
मला जवळ घेत आक्काही रडत होती.. “तिच्या गोजिरवाण्या भावाच्या आयुष्यात पुढे वाढून ठेवलेल्या वादळाची ती सुरुवात होती.काहीतरी दुःखदायक घडतंय हे तिला समजून चुकलं त्या दिवशी”….!
कसेतरी तिनं स्वतःला सावरलं.तिला कळून चुकलं कि, “अंगाखांद्यावर खेळवलेला हा तिचा लाडोबा दिपक भावनिकदृष्ट्या आता तिचीच जबाबदारी झाला होता..”
तिने मला मुलीचे वेशातले ते कपडे बदलायला सांगितले आणि मी उठून टि शर्ट पायजमा चढवला…पण संध्यातरी हे कुणाला सांगू नकोस ,मी आक्काला विनवले..कारण आमच्या वडीलांचा घरात प्रचंड भीतीचा धाक होता…मग पुन्हा मी बहीणीचे कपडे घालणं टाळले आणि अभ्यासात मन रमवले… नियमित शाळेत जाणं घरी आल्यावर अभ्यास करणं.. नंतर उरलेला वेळ बहीणी सोबत खेळणं, मजामस्ती करणं असं दिवस जायचा..
पण हळूहळू माझ्या बायकी हालचाली वागणं, चालणं, बोलणं घरात सगळ्याना अंगवळणी पडलं…सतत महिलांमध्ये सहा बहिणी, चाची, आई ,भाभी यांच्यातच राहुन दिपक असा बनलाय असा समज होता.
घरात म्हणून सगळे रागवतही होते..
पुरुषामधे बसत जा भावासोबत काम करत जा…बायल्यासारखा बायकामधेच घूटमळू नकोस वगैरे वगैरे…
पण शिकवूनही झेपत नव्हते बदल मला…पुरुषी सहवासात चुकल्यासारखं व्हायचं…
एक दिवस आईने घरात विषय काढला कि,माझा छंद आवड मुलींमध्येही रुजावी..एखादी ने तरी भरतनाट्यम शिकावं…
पण बहीणी मधे कुणालाही यात रस नव्हता..आईला वाईट वाटले..मग मी पटकन हो म्हणालो.कारण मला मनापासून आवड होती डान्स करण्याची…
सगळे अवाक् झाले..पण आईने होकार दिला.” मुली नाही शिकत तर मुलगा शिकेन त्यात काय झालं..डान्स कुणीही शिकू शकतं”…
आणि नंतर मग रोज संध्याकाळी आईसोबत मी कथ्थक ,भरतनाट्यम शिकायला डान्स सेंटरला जावू लागलो…
तिथे मुलासारखं वागायचं, बोलायचं, चालायचं असे घरातले सगळे सल्ले देत होते…पण मी खूप प्रयत्न करुनही फारसं जमत नसायचं…मग माझ्या मनातच कधी कधी भीतीचा गोळा यायचा कि, मला नेमकं काय होतय..काय वाटतंय, मी कोण आहे..?
असंच एकदा नववीत असताना आमच्या शाळेत *शकुंतला*हे नाटक बसवले होते पण मुलांचीच शाळा असल्याने शकुंतला चा रोलसाठी मुलगी कुठून बोलवणार ही समस्या होती… तेव्हा वर्गातील मुलं माझ्या आईकडे आली व शकुंतला रोलसाठी दिपकला साडी घालून तयार करुन द्या असा आग्रह धरला..
आई ड्रामासाठी मला तयार करुन द्यायला तयार झाली… आणि
“आयुष्यात पहिल्यांदाच मी साडी घातली, गजरा वेणीसह शृंगार केला”…
आईने ब्युटीशियनकडून माझी तयारी करुन घेतली… आणि हुबेहुब मुलगी शोभत होते .बघणारे सारेच थक्क झाले…मग शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात शकुंतलाचे नाटक पार पडले .तो टाळ्यांचा कडकडाट अजूनही कानात घुमतो.एवढा आनंद मला झाला होता…मी शकुंतला रोलही छान पार पाडला होता..
पण तेव्हा पासुन मात्र मित्र माझ्यात मैत्रीण शोधू लागले होते… माझ्याशी लडीवाळ चावट बोलणे.. स्पर्श करुन छेडणे वगैरे चालू झाले…
मला काही काळ गंमत वाटली म्हणून मीही तसेच लाजणारे,मुलांसोबत बाकावर अंग चोरुन बसणारे रिप्लाय देत होतो..पण एखाद्या टप्प्यावर अती छेडछाड, खोडी होवू लागली कि नकोसे व्हायचे शाळेत बसणे. मित्राबरोबर वेळ घालवत रहाणे….दूर एकटं पडल्यासारखी जाणीव व्हायची..पण माझं अंतर्मन कुणी जाणून घेत नसे…कुणाला सांगताही येत नसे… मानसिक कुंचबना वाढत जात होती.
असेच दिवस भरभर संपत होते ..अखेर मी दहावी उत्तीर्ण होवून अकरावीत मुलं मुलीं असलेल्या काॅलेजला प्रवेश घेतला होता…
आणि याच टप्प्यावर घडलं एक समज नसलेलं शहारा आणणारं नाट्य….एका विचित्र वळणावर आयुष्य येवून ठेपलं होतं….!
क्रमशः पुढील भागात