महाराष्ट्र

जेव्हा सगळं संपलंय… असं वाटतं तेव्हा…!

डॉ. संजय धुर्जड.
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
जीवनाच्या कुठल्याही प्रसंगात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतात. येस आणि नो. कुठलेही काम करण्याचा निर्णय घेतांना मनाचे दोन म्हणणे असतात, ते काम करावे किंवा करू नये. त्याच प्रमाणे, प्रत्येक प्रश्नाचे दोन उत्तरे असतात. पाहिले हो आणि दुसरे नाही. कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग असतात, एक जवळचा आणि सरळ मार्ग, व दुसरा मार्ग लांबचा आणि खडतर असतो.
बऱ्याचदा, आपण जवळचा, सरळ, सोप्पा, सोयीस्कर, कमी कष्टाचा, कमी खर्चाचा, कमी वेळ घेणारा मार्ग किव्हा पर्याय निवडतो. जिथे कष्ट पडतील, त्रास होईल, मेहनत करावी लागेल, पैसे मोजावे लागेल आणि भरपूर वेळ द्यावा लागेल, अशा मार्ग निवडून आपण काम करण्यास सहसा तयार होत नाही. असे करणे योग्यही असू शकते. ते अधिक प्रॅक्टिकल आहे, असा युक्तिवाद करून कठीण मार्ग टाळण्याची वकिली करणे देखील योग्यच म्हणावं लागेल. दैनंदिन कामात असे केले तर चालु शकते, परंतु, कठीण आणि बिकट परिस्थितीत असा सोप्पा निर्णय आणि सोप्पा मार्ग जेवघेणा ठरतो, आणि कठीण आणि कष्टप्रत मार्ग फलदायी ठरतो.
नुकतेच, आपल्याकडे दोन घटना घडल्याच्या आपण बघितल्या आहे. नाशिकमधील एका मोठ्या बिल्डरला आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. का आणि कशामुळे, ते किती खरे आणि किती खोटे, हा आजचा आपला विषय नाही. मुद्दा त्यानंतर घडलेल्या एका दुःखद घटनेचा आहे. त्या बिल्डरच्या एका भावाला अटकेची घटना काही सहन झाली नाही. पोलीस केस, अटक, त्यामुळे होणारी बदनामी त्यास लज्जास्पद वाटली असावी.
आधीच इतकी आर्थिक अडचण त्यात भर म्हणून लोकांचा त्रास, उद्योगधंदा बंद, छोट्यामोठ्या तक्रारी, आणि आता तर भावाला अटक, उद्या आपल्यावरही अशीच वेळ येणार आणि आता सर्वकाही संपले, असे वाटल्यामुळे त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला   असावा. म्हणून त्याने आत्महत्या केली. घटना क्लेशदायकच होती, मन विचलित करणारी होती. परंतु, अशा प्रकारे आत्महत्या करून काय साध्य झाले, काय मिळवले. अशाने प्रश्न सुटला का? प्रब्लेमवर सोल्युशन मिळाले का? त्याचा शेवट गोड झाला का? “नाही”. कारण, त्याने सोप्पा, जवळचा, कमी वेळ लागणारा, कमी कष्ट पडणारा मार्ग / पर्याय निवडला.
सध्या भारतात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप टुर्नमेंट सुरू आहे. त्यात चार दिसवांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान दरम्यान सामना झाला. २९१ रनांचा पाठलाग करतांना ऑस्ट्रेलियाचे ९१ धावांत ७ गडी गारद झाले तेव्हा वाटलं की आता ऑस्ट्रेलियाची हार निश्चित आहे. आता सगळे काही संपले आहे, आपली हार होणारच, जिंकणे अशक्यप्राय वाटत होते. परंतु, पुढे जे झालं ते एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने एकहाती सामना जिंकून दिले.
कुणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते की ऑस्ट्रेलियाचे तीन व्हिकेट शिल्लक असतांना जिंकण्यासाठी २०० रन आवश्यक असतांना अफगाणिस्तानचे हार होईल. मॅक्सवेल ने त्या २०० रणांपैकी १८८ ठोकून द्विशतकी खेळी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. विशेष म्हणजे हे सगळं करतांना त्याला अतोनात त्रास झाला. त्याची पाठ, मांड्या आणि पोटऱ्यांमध्ये गोळे आल्याने तीव्र वेदना होत होत्या. एकेरी, दुहेरी धावा घेणे शक्य नव्हते. तरीही, त्याने जिद्द सोडली नाही. फक्त चौकार, षटकार खेचत होता. पायांची हालचाल (फुटवर्क) न करता, पाय घट्ट रोवून फक्त बॅट फिरवत होता.
विचार करा… ऑस्ट्रेलिया ज्या स्थितीत होती, त्यावेळी मॅक्सवेलच्या मनात काय विचार सुरू असेल? आता आपली हार तर निश्चित झालेली आहे, आपण हरलो तरी त्याचे खापर माझ्या माथी मारले जाणार नाही. जिथे सगळेच रथी-महारथी आऊट झाले, तिथे आपणही आऊट झाल्यास त्यात कुणाला गैर वाटणार नाही. मला इतके भयानक क्रंँप्स येताय, असाह्य वेदना होताय, मग कशाला इतका त्रास करून घ्यायचा? रिटायर्ड हर्ट म्हणून मैदान सोडण्याचा सरळ, सोप्पा, सोयीस्कर, कमी त्रासाचा, आरामदायक मार्ग उपलब्ध होता. परंतु, त्याने तसे केले नाही. स्वतः त्रास आणि वेदना सहन करून, कठीण आणि त्रासदायक मार्ग निवडून त्यावर मार्गक्रमण केले, तेव्हा ऑस्ट्रेलिया तो सामना जिंकू शकले.
हा सामना मी माझ्या देशासाठी जिंकून देणार, त्यासाठी मला त्रास झाला तरी चालेल, वेळ लागला तरी चालेल, नवीन आणि वेगळे शॉट्स मारण्याची गरज असेल तरी मी तसे खेळेल, माझ्या जोडीदारावर विसंबून न राहता स्वतः धावा करेल, शेवपर्यंत हार मानणार नाही, मैदान सोडणार नाही… असा काहीसा विचार मॅक्सवेलच्या मनात सुरू असणार आहे. म्हणूनच सामन्याचा शेवट गोड झाला. असेच, काहीसे १९८३ च्या वर्ल्ड कप मध्ये कपिलदेव ने करून दाखवले होते.
जीवनात आपण असे का नाही करत. नेहमीच सोप्पा, सोयीस्कर, कमी त्रासाचा आणि कमी वेळ लागणारा मार्ग / पर्याय निवडतो. कठीण, लांबचा, त्रासाचा, वेळ लागणारा मार्ग / पर्याय का नाही निवडत? आपण जो मार्ग / पर्याय निवडू त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट्स मिळतात. आपल्याला जे रिझल्ट मिळतात ते आपल्या पर्याय निवडीनुसार मिळतात, हे लक्षात ठेवा.
मग विषय कुठलाही असो, अभ्यासाचा असो, शिक्षणाचा असो, खेळाचा असो, नोकरीचा असो, व्यवसायाचा असो, पैशांचा असो, की आरोग्याचा. तुम्ही एखाद्या कामात जितकी हिम्मत आणि जिद्द दाखवाल, मेहनत घ्याल, कष्ट कराल, वेळ द्याल तितके गोड त्याचे फळ मिळणार. साध्या, सरळ, सोप्प्या मार्गाचे फळ हे तितकेच छोटे, कच्चे, कडू, आंबट मिळेल. चांगल्या आणि गोड फळांसाठी कुठलेही शॉर्ट कट नाही, “हा निसर्गाचा नियम आहे”, हिंदीत याला “कुदरत का कानून” म्हणतात. हे त्रिकाल सत्य आहे, लक्षात ठेवा.
जेंव्हा सगळं संपलंय असं वाटू लागल्यावर मॅक्सवेल आणि कपिलदेवची ती इनिंग आठवा. आयुष्य कधीच संपत नसते…केवळ निकराचा लढा द्यायला हिमतीने उभे राहा. आयुष्यात एक तरी मित्र पॅट कमिन्ससारखा असावा…जो काही न करता खांद्यावर हात ठेवून ‘तू लढ भावा’ म्हणत तुमच्या सोबत असेल आणि तुम्ही समर्थपणे लढू शकाल आणि जिंकून दाखवाल. असाच विचार जर त्या बिल्डरच्या भावाने केला असता, तर आज त्याचा जीव वाचला असता.
असो, एकच विचार या लेखातून घ्यायचा आहे. आयुष्यात जेव्हा जेव्हा दोनपैकी एक पर्याय / मार्ग निवडायची वेळ येईल, त्यावेळी नेहमी कठीण वाटणारा पर्याय / मार्ग निवडा, तो मार्ग खडतर असेल परंतु, त्याचे फळ निश्चितच गोड असतील. निर्णय घेतांना आणि पर्याय निवडतांना कधीही मैदान सोडून जायचे नाही, हिम्मत हारायची नाही, कष्ट करण्याची तयारी ठेवायची, वेळ द्यायची मानसिकता ठेवायची, सहन करण्याची तयारी ठेवावी. असे केल्यानेच अभ्यासात तुमची बिद्धिमत्ता वाढेल, खेळात तुमचे कौशल्य वाढेल, कामात तुमची क्षमता वाढेल, व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक आवक वाढेल, नात्यात गोडवा राहील, आरोग्य सुदृढ राहील व  दीर्घायुषी व्हाल…!
Devyani Sonar

View Comments

  • Excellent sir
    Me khup thakale hote gelya mahina bhara pasun manane, sharirane pan aaj me tumcha lekh vel kadhun vachala maza thakavach gayab zala
    Khup khup thank you sir

Recent Posts

अमेरिकेचा मोठा शत्रू

अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…

5 hours ago

सप्तशृंग गडावर भाविकांच्या गर्दीचे तुफान

नाशिक: प्रतिनिधी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, व्यवस्थापन यांच्या…

6 hours ago

सिन्नर – शिर्डी मार्गावर दातली फाट्यावर दोन दुचाकींचा अपघात; तीन जण गंभीर जखमी

सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर - शिर्डी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात…

12 hours ago

सिन्नरला उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

सिन्नर : प्रतिनिधी शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. 11) प्रारंभ होत आहे.…

13 hours ago

चैत्रोत्सवादरम्यान भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सप्तशृंगगड ः वार्ताहर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून म्हणजे मध्य…

14 hours ago

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे… नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…

1 day ago