बोलठाणच्या नाका परिसराचा कोंडतोय श्वास
बोलठाण : प्रतिनिधी
बोलठाण गावात प्रवेशद्वार म्हणून नाका परिसर ओळखला जातो. मात्र, नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही एक दिवस एखाद्याच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. नाका परिसरातील दुकानांपुढे उभी राहणारी बेशिस्त वाहने व दुकानदारांकडून केले जाणारे दुर्लक्ष हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.
बोलठाण नाका परिसर तसेच जातेगाव रस्ता हा नेहमीच वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असतो. ही समस्या दिवसागणिक भयावह समस्या बनत चालली आहे. भविष्यात ही समस्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर जर कारवाई होत असेल तर मग कुणाचा तरी जीव जाण्याची प्रशासकीय यंत्रणा वाट पाहते की काय, असा प्रश्न उभा राहतो.
वाहतूक कोंडीबाबत स्थानिक, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई केली किंवा योग्य ते उपाययोजना केली तर यापासून सर्वसामान्य नागरिकांची होणारी परवड थांबेल, यात शंका नाही. मात्र, प्रशासन वाहतूक कोंडीच्या समस्येची पाठीराखण करते की काय, असा प्रश्न उभा राहतो. तरी प्रशासनाने याबाबत तत्काळ योग्य ती उपाययोजना करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
When will the traffic congestion problem be solved?