लेकींना न्याय कधी मिळेल?

आई ये आई अशी हाक मारताना एक निरागस छोटी मुलगी, किती गोड आवाज, लहान गटात शिकते, किती स्वप्न डोळ्यात आई मी डॉक्टर होणार असं म्हणत रोज शाळेत जाते. किती सुंदर त्या केसांच्या छोट्या छोट्या वेण्या, त्या वेणीत गोड फुल डोळ्यात तेज, अंगात शाळेत जायचा उत्साह, किती सुंदर ते दृश्य. आई मी कशी दिसते गं हे विचारणारी ती चिमुकली.


एवढ्या मोठ्या जगात तिला जगायचं होतं. तिने डोळ्यात पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवायचं होतं. पण त्या आधीच विकृत मानसिकतेने, राक्षसी वृत्तीने लेकराचा जीव घेतला. मुलगी लेक, कन्या, देवी, विश्वाची जननी असे भारतीय संस्कृती म्हणणारे अरे गेले कुठे सगळे. फक्त मेणबत्ती जाळून मशाली पेटवून लेकराला न्याय नाही मिळणार. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन शिव जयंती थाटामाटात साजरी करून त्या लेकराला न्याय नाही मिळणार. कोणाकडे मागणार ती न्याय मालेगावात जो प्रकार घडला अतिशय क्रूर, जीवाला घोर लावणारी घटना. अशा नालायकांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. अहो आज तिच्यामुळे जग चालू आहे. आज जी स्त्री हे जग सांभाळते आहे तीच इथे सुरक्षित नाही. आता तर लहान लहान लेकरू सुद्धा या विकृत मानसिकतेला बळी पडत आहे. अशी घटना झोप उडवून टाकणारी घटना आहे. एका स्त्रीच्या मनात संतापाची लाट पसरवणारी घटना आहे. काय चूक त्या लेकराची मुलगी म्हणून जन्माला आली ही. या जगात ती एकटी पडली. आज मुली मुलांच्या बरोबरीने समाजात वावरतात, मुली कमवायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, स्वावलंबी झाल्या. इतक्या पुढे मुली गेल्या आहेत. पण तरीही अशी घटना ऐकल्यावर असे वाटते की, आपण एवढे अभागी आहोत की तितकेच आपण जोरात अधोगतीकडे जात आहोत. विश्वाची जननी असणारी जिजाऊंची लेक ही या समाजात सुरक्षित नाही. ती एकटी बाहेर जाऊ शकत नाही, ती शाळेतही सुरक्षित नाही, नोकरीवरही सुरक्षित नाही आणि एकटी घरातही सुरक्षित नाही. जगायचं की नाही त्या लेकीने. हा समाज तर लेकीला कुठेही सुखाने जगू देत नाही. तिचं अस्तित्व हिरावून घेतलंय समाजाने, या राक्षसी वृत्तीने. खेळण्याचं बागडण्याचं वय त्या लेकराचं . अशा घटनांपासून पालक सावध होत आहे का? ही घटना ऐकल्यावर ज्या पालकांना मुली आहेत त्यांची काय अवस्था होत असेल. एकदा बघा त्या कुटुंबाची त्या माउलीची अवस्था काय आहे? कोणाला सांगेल ती माउली तिची व्यथा? त्या चिमुकलीची काय चूक? एकीकडे सरकार सांगत असतं बेटी बचाओ- बेटी पढाओ आणि एकीकडे त्याच लेकीला न्याय द्यायला इतका उशीर का होतो. अहो, असे कृत्य करणार्‍या नालायकांना अशी शिक्षा द्या की परत असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मुलगी म्हणजे ओझे नाही. मुलगी लक्ष्मीची वरदान असते. सरस्वतीची मान म्हणजे मुलगी. पृथ्वीवर अवतरलेली देवता म्हणजे मुलगी. आणि हीच देवी समाजात सुरक्षित नाही. याला कारणीभूत फक्त न्यायव्यवस्था आहे. कोण देईल त्या लेकराला न्याय. कोण देईल त्या आईला न्याय. आपले कायदे शून्य आहेत. असं वाटतं जिजाऊंच्या लेकींना न्याय द्यायला छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत. या राक्षसी जगात असे कृत्य करणार्‍यांना धडे शिकवायला राजे पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला या…

when-will-the-women-get-justice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *