नाशिक : अश्विनी पांडे
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. खड्ड्यांतून मार्गक्रमण करत वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. वाहनांना गॅरेजमध्ये तर घेऊन जावेच लागत आहे. परंतु, नागरिकांनाही मानाचे आणि मणक्याचे आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाली की, नागरिकांना पावसाबरोबर रस्त्यावरील खड्ड्यांचाही सामना करावा लागतो. शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण होत आहे. मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांंमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांची चाळण झालेली असताना काही भागात महानगरपालिकेच्या वतीने डांबरीकरणाचे काम सुरू आहे.
मात्र रस्त्याचे काम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील पाच वर्षांत अंतर्गत रस्त्यांची डागडुजी झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती, त्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडल्याचे चित्र आहे. तसेच शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळेही रस्ते खराब झाले आहेत. तर अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यांत पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने चालवताना मोठे दिव्य पार करावे लागत असल्याचे चित्र आहे.
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असताना याच रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र असल्याने इतर रस्त्याची परिस्थिती अधिक बिकट असल्याचे चित्र आहे. वाहनचालकांना मात्र वाहनासह आपल्या प्रकृतीलाही सांभाळावे लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्ते खराब
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांतही पावसाचे पाणी साचत आहे. तसेच काही रस्त्यांचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी त्यावरील डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर चिखल होऊन वाहने घसरून अपघात होत आहेत.
नागरिकांना जडले आजार
खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या शारीरिक व्याधीत वाढ होत आहे. खड्ड्यांमुळे लचके बसून मान, पाठदुखीचा त्रास नागरिकांना होत आहे. तसेच खड्डा चुकवताना छोटे -मोठे अपघात होऊन दुर्घटना होणे हे तर शहर परिसरात नित्याचेच झाले आहे.
वाहनांचे स्पेअरपार्टही खिळखिळे
खड्ड्यांचा परिणाम वाहनांच्या स्पेअरपार्टवरही होत आहे. वाहनांचे स्पेअरपार्ट खिळखिळे होत आहेत, त्यामुळे वाहनधारकांची गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीसाठी रीघ लागत आहे.
दुरुस्तीवर उधळपट्टी
शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी कोट्यवधीचे टेंडर काढण्यात येतात. मात्र, रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा कायमच आरोप करण्यात येतो. अनेकांकडून आंदोलनेही करण्यात येतात. मात्र, तरीही रस्त्याच्या कामाच्या दर्जात फरक पडताना दिसत नाही.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…