भाजपाच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी महाराष्ट्रात महायुती म्हणून ओळखली जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेली विधानसभा निवडणूक महायुतीने शिवसेनेचे नेते व त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. महायुतीला घवघवीत यश मिळाले. पण भाजपाला महायुतीत सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या त्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तर दिले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचा प्रयोग बिहारमध्ये केला जाईल काय? यावर सध्या चर्चा होत आहे. एनडीएने बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या. एनडीएत भाजपाला सर्वाधिक 95, तर नितीश कुमार यांच्या पक्षाला 85 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातील प्रयोग बिहारमध्ये भाजपा करणार काय, हा प्रश्न आहे. बिहारमध्ये आतापर्यंत भाजपाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. यावेळी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे, पण महाराष्ट्र आणि बिहारमधील परिस्थिती वेगळी आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना वाटत आहे. तसे वाटणे स्वाभाविक आहे; परंतु नितीश नितीश कुमार यांना डावलून आपलाच मुख्यमंत्री करण्याची खेळी भाजपाच्या अंगाशी येऊ शकते. भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी लोकप्रिय चेहरा नाही. सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांचा विचार होऊ शकतो. नितीश कुमार यांना डावलण्यात आले किंवा तसा प्रयत्न झाल्यास केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार डळमळीत होण्याचा धोका आहे. केंद्रात भाजपाकडे बहुमत नाही. मोदी यांचे सरकार तेलुगु देसमच्या 15 आणि जनता दल युनायटेडच्या 12 खासदारांच्या पाठिंब्यावर तग धरून आहे. बिहारमध्ये भाजपाने डावलण्याचा प्रयत्न केला, तर नितीश कुमार गप्प कसे बसतील? याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंंद्राबाबू नायडू (तेलुगू देसम) यांचाही भाजपावर असलेला विश्वास उडू शकतो. भाजपा आपल्याला केवळ वापरून घेत असल्याची भावना एनडीएतील पक्षांमध्ये निर्माण होऊ शकते. बिहारमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. ज्या राज्यात भाजपाचा अद्याप स्वत:चा मुख्यमंत्री झालेला नाही, त्या राज्यात भाजपाने आपली आपली स्थिती मजबूत केली आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपाने सादर केले नव्हते. आता सत्तेसाठी भाजपा आणि जनता दल युनायटेडला एकत्र राहणे भाग आहे. नितीश कुमार यांना डावलण्याचा कोणताही प्रयत्न केंद्रात पेचप्रसंग निर्माण करू शकतो, याची जाणीव ठेवून दोन पावले मागे घेऊन नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरच बसविण्यास भाजपाला राजी व्हावे लागेल. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला 74, तर जनता दल युनायटेडला 43 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपाने दिला होता. त्यानुसार नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते. यावेळी एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या, पण त्यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपाने दिला नव्हता. मुख्यमंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न केल्यास केंद्र सरकारवर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव झाल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाने हालचाली सुरू केलेल्या नाहीत. एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड होईल, असे दिसते. तत्पूर्वी, सत्तेचे वाटप करावे लागेल. चिराग पासवान (लोक जनशक्ती), जीतनराम मांझी (हिंदुस्थान अवामी मोर्चा), उपेंद्र कुशवाह (राष्ट्रीय लोक मोर्चा) यांनाही सत्तेत वाटा द्यावा लागेल. सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेचा रिमोट आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाण्याची शक्यता आहे. अर्थात, नितीश कुमार यांना न दुखावता. एनडीएतून बाहेर पडून वेगळी भूमिका घेण्याची संधी कोणत्याही पक्षाला नाही. प्रतिस्पर्धी महागठबंधन बहुमताच्या जवळपासही नाही. त्यामुळे मागचे सरकारच परत येणार आहे. नव्या सरकारला आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनाच पुन्हा संधी द्यावी लागेल, असे एकंदरीत दिसत आहे.