न्यू इयर रेजोल्युशन का तुटतात ?

डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
नवीन वर्ष किव्हा वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी नवीन संकल्प केला जातो. त्याला आपण न्यू इयर किव्हा बर्थडे रेजोल्युशन म्हणतो. नवीन वर्षात आणि भविष्यात काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे, काहीतरी चांगले, काहीतरी उपयोगी, काहीतरी फायदेशीर, काहीतरी भन्नाट करूया या उद्देशाने काहीतरी ठरवले जाते. नवीन नवीन चार दिवस त्यावर अंमल करून काम सुरूही होते. परंतु, काही दिवसांतच आपण ते काम करणे सोडून देतो, त्याचा विसर पडतो किव्हा त्यावर काम करणे बंद करतो. कधी विचार केलाय का, की हे असं का होतं आणि कसं काय होत असतं. आपण कुठे कमी पडतो, का कमी पडतो आणि जे काही ठरवतो ते पूर्ण का नाही होत. चला, आज यावर नजर टाकूया, काही निष्पन्न होतंय का बघूया आणि त्यातून तुम्हाला काही मार्गदर्शन घेता येतंय का ?
वजन कमी करणार, नियमित व्यायाम करणार, वॉक / जिम सुरू करणार, सिगरेट बंद करणार, ड्रिंक्स बंद करणार, चांगला अभ्यास करणार, वाचन सुरू करणार, अमुक काही शिकणार … असे तुम्ही यापूर्वी न्यू इयर रेजोल्युशन म्हणून ठरवले होते. त्यावर काम सुरूही केले होते, परंतु काही दिवसांतच ते कधी बंद पडले ते कळले सुद्धा नाही. नंतर कधी त्याची आठवण आली तेव्हा वाटले की पुन्हा ते सुरू करावे. करू करू, म्हणत ते कधी सुरूच नाही झाले. एक वर्ष उलटून गेले, तरी नाही झाले. मग पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठरवले की आता यावर्षी तर नक्की करू. आणि असं करत करत बरेच वर्ष निघून गेले. मग, ते काम सुरू न केल्याने होणाऱ्या त्रासामुळे किव्हा नुकसानीमुळे, नाईलाजास्तव ते काम तुम्हाला सुरू करावे लागले आणि म्हणून तुम्ही ते केले.
असं नाही की तुम्ही आजवर कुठलेच रेजोल्युशन साध्य नाही केले. जरूर एखादे दुसरे रेजोल्युशन पूर्ण केलेही असणार आहे. मग, कधी हा विचार केलाय का, की एखादे रेजोल्युशन पूर्ण होते, आणि काही पूर्ण नाही होत. असे का होत असावे. काय कारण असावे. कुठले रेजोल्युशन पूर्ण होऊ शकते आणि कुठले तुटू शकते, कसे ओळखावे? आणि ते तुटतात त्याला सिद्धीस नेण्यासाठी काय करावे? प्रत्येक ठरवलेले काम / रेजोल्युशन कसे तडीस न्यावे, याची गुरुकिल्ली मिळाली तर किती भारी होईल, नाही का ? बघूया कसे होते ते.
तुम्ही यापूर्वी ठरवलेले परंतु तुटलेले एखादे रेजोल्युशन आठवा. असे रेजोल्युशन आपण का करतो, कारण आपल्याला माहीत असतं की आत्तापर्यंत आपण त्याच्या अगदी उलट करत असतो. आणि हेही माहीत असतं की जे काही करतोय ते आपल्यासाठी नुकसानकारक असतं, फायदेशीर नसतं, त्याचा आपल्याला त्रास होणार आहे किव्हा ते वाईटच आहे, हेही माहीत असतं. आपल्या स्वतःमध्ये किव्हा जीवनात चांगला बदल घडावा म्हणून तसा निर्णय घेतलेला असतो.
याचा अर्थ असा आहे की, नवीन निर्णय घेतांना भूतकाळातील वास्तव, घटना, प्रसंग, अनुभव आणि नकारात्मक भावनेतून सकारात्मक निर्णय घेतले गेले होते. यामुळे नवीन सकारात्मक निर्णय टिकत नाही, कारण त्याचा पाया नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना असतात. म्हणून ते निर्णय तडीस जात नाही. नुकसान किव्हा त्रास होऊ नये म्हणून घेतलेले निर्णय फार काळ टिकत नाही. ते केवळ भीतीपोटी ठरवलेले असते. जेव्हा धोका / वेळ टळतो, तेव्हा त्या निर्णयातले इंधन संपून जाते, आणि त्या कामाची गाडी बंद पडते. हे रेजोल्युशन फेल होण्याचे मुख्य कारण आहे. पुढे जाऊन ते काम/बदल न केल्याने नुकसान/त्रास झाल्यानंतर ते काम तुम्ही पूर्ण केले असेल, परंतु ते तुम्हला करणे भाग होते, म्हणून तुम्ही ते केले.
दुसरे असे की, तुम्ही हे समजून घेणे गरजेचे आहे की, तुम्हाला जो बदल करायचा असतो, त्याच्या उलट काम तुम्ही करत असतात. म्हणजे तसे करण्याची तुम्हाला सवय (Habit) पडलेली असते. आता, सवय म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे. सवय म्हणजे नकळतपणे, सुप्तपणे, कुठलाही फारसा विचार आणि श्रम ने घेता, असे सहजपणे एखादे काम केले जाते त्याला सवय म्हणतात. ते काम सहजपणे तुम्ही अंगीकृत केलेले असते. उदा. चालणे, गाडी चालवणे, मातृभाषेत बोलणे, जेवण करणे या सवयी प्रत्येकालाच असतात. काहींना भुवया उडवणे, मानेला झटका देणे, केसांत हात घालणे, विशिष्ट हातवारे करणे अशा सवयी असतात. त्या सहजपणे, नकळत ती व्यक्ती करत असते. अशा सवयी तोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. टोकावं लागतं. तेव्हा कुठे अशा सवयी बदलतात. या वरील सवयी वाईट नाही. परंतु, मद्यपान करणे, सिगारेट/बिडी ओढणे, ड्रग्स ची नशा करणे, या सवयी वाईट असतात. शरीराला आणि जीवाला घातक असतात. त्या निश्चितच बदलल्या पहिजे. न्यू इयरला अशा सवयी बंद करण्याचे रेजोल्युशन अनेक जण करतात. परंतु हा निर्णय फारसा टिकत नाही. कारण या गोष्टींची सवय झालेली असते. आणि जेव्हा सवय अतिप्रमाणात होते, त्याला व्यसन म्हणतात.
रेजोल्युशन तुटण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रेजोल्युशन करण्याचे कारणच स्पष्ट नसते. नाही समजलं का? याचा अर्थ असा की, आपण जे रेजोल्युशन करतो, त्याचा उद्देश निश्चित नसतो. आपण हे रेजोल्यूशन का करतो आहे, याचा उद्देश काय आहे? कशासाठी करायचे आहे? हे केल्याने काय फायदा होणार आहे? स्वतःला काय फायदा होणार आहे, इतरांना कसा उपयोग होणार आहे? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतात. भावनेच्या प्रभावात आपण निर्णय तर घेतो, परंतु तो निर्णय फार काळ टिकत नाही. आपणच तो विसरून जातो, कंटाळा करतो, आणि नंतर सोडून देतो. कुठलीही गोष्ट करतांना त्याचा उद्देश ठरवा, त्याचे कारण शोधा की मला हे का करायचे आहे? उद्देश/कारण नसेल तर ते काम होणारच नाही, हे लक्षात ठेवा. आणि जरी काम झालेच तर त्यातून काही फळ मिळत नाही, उद्दीष्ट सफल होत नाही, निष्कर्ष निघत नाही, त्याचा अनुमान देखील निघत नाही. थोडक्यात काय तर त्यातून रिझल्ट मिळत नाही.
तुम्ही ठरवलेले रेजोल्युशन टिकवायचे असेल तर तुम्ही तुमचा निर्णय इतरांना सांगा. वयक्तिक रेजोल्युशन्स असल्यास जवळच्या लोकांना सांगा, मित्रांना सांगा. सामुदायिक निर्णय शेजारच्यांना सांगा, सोबत काम करणाऱ्यांना सांगा, ग्रुपला सांगा. असे केल्याने तुमचे रेजोल्युशन जिवंत रहाते. ते जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला मदत करतात, तुम्हाला त्याची आठवण करून देतात. कधी कधी हिणवतात, हसतात, खिल्ली उडवतात, टोमणे मारतात. असे करणाऱ्यांना रागावू नका, कारण तुम्ही ठरवलेल्या रेजोल्युशन चीच तुम्हाला आठवण करून देत असतात.
रेजोल्युशन खात्रीशीरपणे साध्य करायचे असल्यास तुमच्या पार्टनर ला सांगा. नवरा/बायको, मित्र/मैत्रीण, आई/वडील यापैकी जो कुणी खूप जवळची, काळजी करणारी, काळजी घेणारी व्यक्ती असेल, त्याला सांगा. तो बरोबर तुमच्याकडून ते काम करून घेईल. यावर्षी मी सांगितल्या प्रमाणे रेजोल्युशन करा. रेजोल्युशन ठरवताना सांगितल्याप्रमाणे गोष्टी करा. त्याचे कारण शोधा, उद्देश ठरवा, त्याचा तुम्हाला आणि इतरांना काय फायदा/उपयोग  होणार आहे हे ठरवा. आपण निराशेपोटी, भीतीपोटी, नकारात्मक विचारातून तर निर्णय घेत नाहीए ना, हे बघा. ठरवलेला निर्णय सफल झाल्यास मला नक्की कळवा, मला आनंदच होईल.
*

0 thoughts on “न्यू इयर रेजोल्युशन का तुटतात ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *