आउटलेट कशाला हवा?

*
इनलेटलाच फिल्टर लावा…
डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
दोन दिवसांपूर्वी एक विलक्षण बातमी वाचण्यात आली. भारतीय सिनेसृष्टीतील मराठी आणि हिंदी भाषेत गेल्या २५ वर्षांत अनेक सुपरहिट फिल्म्स आणि मालिकांची  निर्माती, कला दिग्दर्शन, आणि दिग्दर्शन करणारी व्यक्ती, नितीन चंद्रकांत देसाई, यांनी त्यांच्या स्टुडिओत आत्महत्या केली आहे. बातम्यांतून असे कळले की देसाईंचे कर्जत जवळ ५२ एकरात एन. डी. स्टुडिओ असून त्यात अनेक बड्या फिल्म्स आणि बिग बॉस सारख्या असंख्य मालिकांची शूटिंग होत असे.
त्यांच्यावर अडीचशे कोटींचे लोन थकीत असल्या कारणाने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी ती बातमी होती. त्यांच्या सारख्या व्यक्तीवर इतक्या टोकाची भूमिका घेण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी आहे. देव करो, आणि अशी वेळ दुश्मनावरही येऊ नये, हीच अपेक्षा. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीची कधीही भरून न निघणारी क्षती झाली आहे, असे मला वाटते. त्यांच्या कामातून त्यांची आठवण नेहमीच  होत राहणार आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या अकाळी संकटाला पेलण्याचे सामर्थ ईश्वर त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला देवो, ही प्रार्थना.
त्यांच्या जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. अनेकांनी सोशल मीडिया, टीव्ही आणि प्रिंट मीडियात यावर भरभरून लिहिले आहे. त्या लिखाणात यापूर्वीचे अनेक उदाहरणे देऊन एक बाब अधोरखीत करण्याचा प्रयत्न केला आहे, की प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक “आउटलेट” हवे. मग ते “आउटलेट” कुणासमोर किव्हा कुणाकडे व्यक्त करावे, याबद्दल विविध पर्याय सांगितले.
त्यातही, असा एक जवळचा, जिवाभावाचा मित्र, किव्हा मैत्रीण असावी, जिच्याकडे आपण आपली व्यथा, अडचणी, आपली काळजी, चिंता, ताण, तणाव, संकटे आणि काही गुपितं बाहेर काढू शकतो. आपल्याला कान देणारी, आपली मानसिक स्थिती समजून घेणारी, अडचणीतून बाहेर काढणारी, मदत करू शकणारी, धीर आणि आधार देणारी एखादी व्यक्ती आपल्या जीवनात असावी, असा एकसमान सूर या लेखांतून जाणवला. सूचना आणि उपाय चुकीचे नाहीएत, कारण एकंदरीत हल्लीच्या धकाधकीची, स्पर्धेची, तणावाची, अपेक्षांची आणि कुरघोडी करण्याची जीवनशैली यामुळे जीवनच संपवण्याची प्रवृत्ती वाढली आहे, आणि भविष्यातही ती वाढणारच आहे.
एडॉल्फ हिटलर पासून, ते मागील दशकभरात घडलेल्या घटना बघितल्या तर, स्वामी विज्ञानानंद, भैय्युजी महाराजांसारखे आध्यात्मिक गुरू, सुशांत सिंग, तुमिषा शर्मा, कुशल पंजाबी यांसारखे कलाकार, डॉ. शीतल आमटे (करजगी), डॉ. ज्योत्स्ना थोरात, नाशिकचे माजी पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांसारखे उच्चशिक्षित आणि उच्चपदस्त व्यक्तींना काहीना काही कारणांमुळे आपली जीवनयात्रा संपावण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचणे भाग पडले.
छोट्या-मोठ्या घटनांत डॉक्टर्स, सरकारी अधिकारी, व्यावसायिक, आणि विशेष करून विद्यार्थी यांच्याबद्दलही आत्महत्येच्या बातम्या वाचण्यात येतच असतात. अशा काही घटना घडल्या की उपाय आणि तत्वज्ञानाच्या फैरी सोशल मीडिया आणि अन्य मिडियांवर झडत असतात. चर्चा होतात, कारणमीमांसा केली जाते, सल्ले दिले जातात, उपाय सुचवले जातात, याला त्याला दोष देऊन सगळेच जण मोकळे होतात. ठोस असे काही हाती लागत नाही. पुन्हा एखाद्या आत्महत्येची बातमी आली की वरील सगळ्या गोष्टी पुन्हा रिपीट होतात, आणि पुन्हा होतात, आणि पुन्हा होतात.
नितीन देसाई हे एक हाडाचे कलाकार होते. अभिनयापासून सुरू केलेला व्यावसायिक प्रवास, कला दिग्दर्शक, निर्माता ते एक बिजनेसमन पर्यंत येऊन संपला. संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विदू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी यांच्या सारख्या नामांकित दिग्दर्शकांच्या कल्पनेतील कथांना दृष्यस्वरूप पार्श्वभूमी निर्माण करून, रुपेरी पडद्यावर झळाळी आणि चकाकी देणारा, कल्पक, दृष्टा, अभ्यासक वृत्ती असलेल्या या हिऱ्यासमान मानवाला आर्थिक बोजा का नाही पेलवला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
तुम्ही रुपेरी पडद्यावर अनुभवलेल्या जोधा, अकबर, बाबासाहेब आबेडकर, अजिंठा मधील अभिनेत्री, हम दिल दे चुके सनम मधील समीर नंदिनी जोडी, लगान मधील भुवन, देवदास मधील देव बाबू पारो चांद्रमुखी, बालगंधर्व, 1942च्या काळातील भूमीकेत अनिल कपूर, मनीषा कोईराला, सलाम बॉम्बे मधील करोडपती चा सेट, राजा शिवछत्रपती मधील राजे, जिजाऊ, शहाजीराजे, सरदार आणि मावळे पडद्यावर जिवंत करणारे, त्या त्या काळात जगण्याचा फील यावा असे सेट बनविणारे नितीन देसाई यांच्याकडे स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी असे काय नव्हते, याचा कधी विचार केला आहे का?
नाही ना, मग आता करायला हवा. कारण या दृष्टिकोनातून विचार केला तर कदाचित आपल्याला परिस्थितीचे गांभीर्य लक्षता येईल, ती परिस्थिती निर्माण का झाली याचे कारण समजेल, त्या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर कसे पडता आले असते याचे उत्तर मिळू शकते. व्यापक विचार केला तर, असे प्रकार घडतातच का, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. साहजिकच, आपल्याकडे या प्रश्नांचे उत्तरे नाहीए, म्हणून तर असे प्रकार घडत आहे, आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे.
मी असा विचार करतो की, “आउटलेट” बनविण्यापेक्षा, जर आपण “इनलेटलाच” फिल्टर लावले, तर किती छान होईल. तो ताण, तो बोजा, तो स्ट्रेस, ते दडपण, ती भीती, तो राग, तो संताप, ती चिडचिड, ती हतबलता, ती निराशा, आणि ती जीवन संपवण्याची इच्छा निर्माणच झाली नाही, तर निश्चितच हे आत्महत्येचे प्रकार होणार नाही. आत्महत्या तर टोकाची भूमिका झाली, छोटे मोठे मानसिक तणाव, मानसिक आजार, वाद, भांडण, तक्रारी सुद्धा कमी होण्यास मदत होईल, नाही का?
डोक्यात निर्माण झालेला आणि साचत जाणार कचरा बाहेर काढण्यासाठी छिद्र करून “आउटलेट” तयार करण्यापेक्षा, तो कचरा आत जाणारच नाही, आणि गेला तरी तो तर्काधारीत, तटस्थ स्थानी राहून, आणि सत्यतेवर आधारित विचार करून तो कचरा शुद्ध केला तर किती छान होईल, नाही का? हे काल्पनिक नसून, हे एक शास्त्र आहे, जे सहज शक्य आहे. केवळ पॉजीटिव्ह विचार केल्याने होणार नाही, तर तर्कांवर आधारित विचार केल्याने योग्य तो मार्ग दृष्टीस पडून, आपण यातून सही सलामत बाहेर पडू, याची मला खात्री आहे.
कारण मी ही याच पद्धतीने विचार करतो, आणि त्यावर अंमल करतो. या लेखमालिकेतील पुढील भागांमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करूया. (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *