इनलेटलाच फिल्टर लावा…
डॉ. संजय धुर्जड.
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
तुमच्या डोक्यातील विचारांत, तुमच्या शरीरात आणि तुमच्या भोवतीच्या वातावरणात झालेल्या बदलांमुळे होणारे मानसिक, शारीरिक आणि भावनिक परिणाम, म्हणजे तणाव. इंग्रजीत आणि उच्चभ्रू लोकांच्या भाषेत त्याला “स्ट्रेस” म्हणतात. डोक्यातील विचारांचा शरीरावर होणारा परिणाम, म्हणजेच “भावना” (जाणीव). त्यामुळे, तुम्हाला तणाव कमी करायचा असेल तर तुमच्या विचारांवर, शरीरावर आणि तुमच्या सभोवतालच्या वातावरणावर तुम्हाला काम करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल, सजग असावे लागेल, जागरूक राहून जाणीवपूर्वक विचार करावा लागेल. आपल्या डोक्यात काय विचार सुरू आहे? आपल्याला काय होत आहे? शरीरावर काय परिणाम होत आहे? मनातील भावना ओळखाव्या. मनात आणि शरीरात काय जाणवते? विचारांतूनच आपल्याला काळजी वाटते, चिंता वाटते, भीती वाटते, चिडचिड होते, राग येतो, वाईट वाटते, निराश वाटते… वगैरे, वगैरे. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. मनात आणि डोक्यात काय चालले आहे, आणि काय होते आहे, हे ओळखावे. यासाठी थोडा वेळ लागेल, प्रॅक्टिस लागेल, जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने तुम्ही ही जाणीव अनुभवण्यात यशस्वी व्हाल.
नितीन देसाईंची आत्महत्या ही याच स्ट्रेसचा परिपाक आहे. कदाचित त्यांना या स्ट्रेसबद्दल वेळीच जाणीव झाली नसेल, आणि झाली जरी असेल तरीही, ती प्रत्यक्षात उतरविण्याचे कौशल्य आत्मसात करता आले नसेल. याविषयावरील माझ्या मागील लेखांत स्ट्रेस घालविण्याच्या कौशल्याबद्दल आपणाला माहिती दिली आहे. तुमच्या मनातील विचारांना आणि भावनांना “आउटलेट” असावे, जेणेकरून स्ट्रेस रिलीफ मिळेल, ही सर्वसाधारण विचारसरणी बरोबर आहे, परंतु, त्याच्यातील अडचणी, अडथळे, मनुष्याचा स्वभाव, परिस्थिती आणि त्यात जोखीम असल्यामुळे ते सहजासहजी अमलात आणणे अवघड वाटते. “आउटलेट” असण्यापेक्षा जर “इनलेटलाच” फिल्टर लावले तर पुढील सगळ्याच गोष्टी नियंत्रणात राहतील, असे मी मानतो. त्यासाठी ठराविक पद्धतीने विचार आणि कृती करणे आवश्यक आहे. तुम्ही देवाचे अंश आहात, तुमच्यात देव आहे, प्रॉब्लेम ऐवजी सोल्युशनवर फोकस करणे, पर्याय शोधून त्यावर कृती करणे, उतू गेलेल्या दुधाप्रमाणे झालेल्या आणि होऊन गेलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नये, एखाद्या अपयशाने खचून न जाता नव्याने सुरवात करावी, कुठल्याही प्रसंगी वाईटात वाईट जे होऊ शकते त्यासाठी मानसिक तयारी करणे, माकडाने पकडलेल्या केळीप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल किव्हा परिस्थितीबद्दल स्वतःचे मत, काही ग्रह, किव्हा दृष्टीकोन बनवलेला असेल तर तो सोडून देऊन आपली स्वतःची सुटका करून घेणे… असे काही उपाय सुचविलेले होते.
तुम्ही म्हणाल की, सांगणे सोप्पे आहे, करणे आणि अमलात आणणे अवघड आहे. अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे. एखादी माहिती किव्हा ज्ञान मिळाल्याने लगेचच त्याचा लाभ होत नाही आणि अमलातही आणता येत नाही. कारण ते ज्ञान आणि ती माहिती तुम्ही जोवर अंगीकृत करत नाही, तोवर ते प्रत्यक्षात घडत नाही. त्यासाठी तुम्हाला वारंवार त्यावर सराव करावा लागेल. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. अनेक दिवस, कधीकधी अनेक वर्षे सराव केल्यानंतरच ते कौशल्य आणि ती क्षमता तुमच्यात विकसित होते, हे तर काही वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणून, स्ट्रेस निर्माण होऊ नये, किव्हा असलेला स्ट्रेस घालवण्यासाठी वरील उपाय आणि पर्याय अंगवळणी पडण्यासाठी तुम्हाला यावर पुन्हा पुन्हा काम करावे लागेल. स्मरणात रहावे यासाठी घरात, कामाच्या ठिकाणी, येता जाता दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवणे, बघणे, वाचणे, लक्षात ठेवणे, गरज पडल्यास एखाद्या तज्ञाशी चर्चा करणे, असे सतत करावे लागेल. उदा. मी अमुक एक ऑपरेशन वाचून समजून घेतले, किव्हा एकदा बघितल्याने त्यात मी तरबेज होत नाही, ते माझ्या अंगवळणी पडत नाही, माझ्यात सहजता येत नाही. त्यासाठी मला तसे किमान ५ ते १० ऑपरेशन्स करावे लागतील, माझ्या वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यातील स्टेप्स, त्यातील बारकावे लक्षात ठेवावे लागेल. इतके सर्व करूनही एखाद्या पेशंटच्या बाबतीत मला अडचण आल्यास, मला पुन्हा अभ्यास करावा लागेल, सराव करावा लागेल, प्रसंगी कुणाचीतरी मदत घ्यावी लागेल, तेव्हा ते ऑपरेशन सुरळीतपणे करता येईल.
शाळेत, कॉलेजात असतांना विविध विषयावरील तासांचे टाइम टेबल दिला गेला होता. आठवड्याभरात रोजच्या रोज होणारे तास आपल्या लक्षात असायचे. पाढे पाठांतर असायचे, कविता पाठ असायच्या, सायन्सच्या आकृत्या, सूत्र, फॉर्म्युले… ई गोष्टी स्मरण करण्याची एक पद्धत होती. त्यावेळी कंपास बॉक्स मध्ये, रोजनिशी डायरीत, अभ्यासाच्या ठिकाणी, होस्टेलच्या भिंतीवर, नोट्स मध्ये ते लिहून, चिटकवून ठेवायचो. येताजाता, ते बघून बघून पाठ झाले. पाढे, कविता वारंवार म्हणून म्हणून ते पाठांतर झाले. तसेच, काहीसे आपल्याला या वरील उपयांबाबत करायचे आहे. यापैकी जो उपाय आणि पर्याय आपल्याला सोपा, सहजपणे करण्यासारखा, आवडता वाटल्यास तो लिहून ठेवा, समोर ठवा, येताजाता दिसेल असा ठेवा, घरात, कामाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावा. हे वाचतांना, तुम्हाला बालीशपणाचे वाटत असले तरी हे कराच. त्याची उजळणी करा. हळू हळू ते तुमच्या अंगवळणी पडेल, सहजतेने करता येईल, तुमच्या स्वभावात येईल, तुम्हाला वास्तवात ठेवेल, आणि योग्य वेळी आठवण झाल्याने पुढील चुका घडणार नाही. लक्षात ठेवा, “आउटलेट” पेक्षा “इनलेट” मॅनेज केल्यास जास्त फायदा होईल. डोके शांत राहील, नकारात्मक विचार सकारात्मकतेत परिवर्तित होतील. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभेल.
अजूनही तुम्हाला वाटत असेल, की हे सर्वकाही करणे अवघड आहे, तुम्हाला जमणार नाही, किव्हा तुम्हाला करायचेच नाही, तर मी तुम्हाला तुमच्या “इनलेट” ला फिल्टर लावण्याचा आणखी एक उपाय सांगतो. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला, तुमच्या मेंदूची कार्यपद्धती लक्षात घ्यायला हवी. मानवी मेंन्दूचे एक खास वैशिष्ट्य आहे. ते असे की, मानवी मेंदू “एका वेळेला एकाच गोष्टीचा विचार करू शकतो”. तुम्ही म्हणाल की आता हे काय नवीन आहे? माझ्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार येतात, मी एकाच वेळी अनेक विषयांवर विचार करू शकतो, कामं करू शकतो. खरं तर, असे होत नाही. असे जरी आपल्याला वाटत असले तरी, एका क्षणाला एकच विचार असतो. फारतर, एका विचारानंतर दुसरा विचार, दुसऱ्यानंतर तिसरा, मग चौथा, पाचवा, असे वेगवेगळ्या विषयांवर भराभर विचार येतात. फटाफट विचार बदलत असतात, म्हणून तुम्हाला असे वाटते की एकाच वेळी अनेक विचार येतात. आता, मेंदूच्या या कार्यपद्धतीचा आपण स्ट्रेस घालवण्यासाठी कसा वापर करू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना? खूप सोप्पे आहे. काळजी करायला लावणारे, चिंता वाढवणारे, मनाला वाईट, उदासीन वाटणारे, भीती वाटणारे, क्रोध वाढवणारे, वाद भांडण घडवणारे, नकारात्मक विचार येत असतल्यास, अशा वेळी स्वतःला एखाद्या दुसऱ्या, वेगळ्या कामात गुंतवून ठेवले, की आपोआपच वरील विचार डोक्यातून निघून जातील. मूळ नकारात्मक आणि हानिकारक विचारांच्या ठिकाणी तुम्ही गुंतलेल्या कामाबद्दलचे सकारात्मक आणि उपायकारक विचार डोक्यात निर्माण होतील.
म्हणजे नेमकं, काय काय करावे? हाही प्रश्न आहेच. मन, मेंदू आणि चित्त शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा हा सर्वोत्तम पर्याय आहे. सुरवातीला डोक्यात अनेक विचार येतील, ते कमी करण्यासाठी तुमचे श्वासावर लक्ष केंद्रित करा, शरीराच्या विविध भागांवर लक्ष केंद्रित करून शरीरातील ऊर्जाप्रवाह, रक्तप्रवाह, आणि संवेदना अनुभवा. अगदीच अनुभव नसल्यास यू-ट्यूबवर “गाईडेड मेडिटेशन” नुसार हेडफोन लावून त्याप्रमाणे ध्यानधारणा करू शकतात. एखाद्या मंत्राचा उच्चार किव्हा श्रवण करू शकता. त्याचप्रमाणे, स्वतःविषयी रोज किमान १० – २० सकारात्मक वाक्य बोला. सकारात्मक वाक्य म्हणजे त्यात न, नाही, नको, नये, नसणे असे नकारात्मक शब्द नसावेत. वाक्य स्वतःबद्दलच असावे, इतरांबद्दल नसावे. वाक्य वर्तमान काळातील असावे, जे बोलला ते आत्ता घडते आहे अशा अर्थाचे असावे. जे घडते आहे, ते चित्र/चित्रपट स्वरूपात बघावे. त्याचप्रमाणे जे बोलाल तसे भाव आणि भावना निर्माण करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होईल. व्यायाम केल्याने शरीरात, मस्तिष्कात काही ग्रंथीय द्रव उत्सर्जित होतात, त्याचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक बदल घडतो, मूड वृद्धिंगत होतो. शारीरिक ताकद आणि क्षमता वाढल्याने छोटेमोठे शारीरिक व्याधी बरे होतात. व्यायाम करतांना, एखादे छानसे व आवडीचे गीत, संगीत, श्लोक, मंत्र, व्याख्यान, प्रवचन, तत्वज्ञान, धर्मविचार ऐकले तर नक्कीच सकारात्मक विचार निर्माण होतात. रोज किमान एखाद तास लिखाण आणि वाचन करावे. नवीन विचार, नवीन संकल्पना, नवीन आयडिया, एखादा नवीन पर्याय, उपाय मिळाल्याने तुमचे विचार, दृष्टिकोन, तुमचे मत, मन आणि भावना बदलण्यास मदत होईल.
वरील गोष्टी करण्यास दिवसभरातील काही तास खर्च होतील, परंतु २४ तासांतील उर्वरित बहुतांश वेळात तुम्ही काय करायचे, हाही प्रश्न आहेच. उपाय एकच आहे, स्वतःला रिकामे ठेवू नये. सतत काही ना काही कामात व्यस्त ठेवणे. एखादी जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्यात वेळ घालवावा. विशेष करून आवडीच्या कामात स्वतःला व्यस्त ठेवले तर सहज येणारे नकारात्मक विचार येणार नाही. याला मी डोक्यातील मुंग्या म्हणतो. इंग्रजीत त्याला ANTs (अँट) म्हणतात, पुरणार्थ “ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स”. काहीही न करता, विनापरिश्रम मनात येणारे विचार म्हणजे अँट्स. लहान मुलांचे मन चंचल असते, ते गप्प आणि शांत बसत नाहीत, परंतु प्रौढ लोक, विशेषतः घरातील महिला (गृहिणी), ज्येष्ठ, रिटायर्ड लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. रिकाम्य फावल्या वेळातच खूप विचार येत असतात. ते टाळण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे. अगदी एखाद्या देवाचा, स्वामींचा किव्हा गुरूंचा मंत्र जप, किव्हा नामाचा जप केलात तरी उत्तमच. जप करण्यातही हेच तंत्र कार्य करते. मंत्रोच्चार किव्हा नामाचा उच्चार करतांना डोक्यात इतर विचार येत नाही, कारण मेंदूची ती मर्यादा असते, की एका वेळी एकच विचार करू शकतो. इथे कुठल्या जाती, धर्म, पंथ, समुदाय किव्हा संप्रदायाचा भेद करत नाही, तुमची ज्यावर श्रद्धा आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता.
हे जीवन अमूल्य आहे, त्याचे मोल करता येणे शक्य नाही. तसेच हे शरीरही अनमोल आहे. हे नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार तर नाहीच, परंतु हे नष्ट करण्याचा विचार करून त्याचे मूल्य कमी करण्याची आपली तितकी लायकी नाही. आपण या जन्मास यावे, ही त्या देवाची इच्छा (परमेश्वर, ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती, वैश्विक ऊर्जा, किव्हा तुम्ही ज्या कुठल्या देव, देवतांना मानता). त्याच्या इच्छेविरुद्ध काही करणे, वागणे हे पाप आहे. आपण इथे आलो आहोत, तर त्यामागे काहीतरी कारण आहे, काहीतरी उद्देश आहे. तो उद्देश शोधा. स्वहित, हा उद्देश नक्कीच नाहीए, कारण स्वहितच जपायचं असतं तर मानवी जीवनात कशाला, तुम्हाला एखाद्या वन्य जीव, प्राणी, किडे, मुंग्या, कुत्रे, मांजराच्या जीवनात घडवले असते. ते सगळेच जीव स्वतःसाठी जगतात, स्वतःच्या जीवाचे संरक्षण करतात, दुसऱ्याला मारून स्वतः जिवंत राहतात. मानवी जन्मास आलो आहोत, तर केवळ जगणे आणि जिवंत राहणे, या पलीकडेही काही उद्देश असेल. तो शोधा. त्यासाठीचा मार्ग आणि तो उद्देश साध्य करण्याचे उपाय आणि गंतव्य स्थान शोधा. स्वतःसाठी जगण्यासोबतच इतरांसाठीही जगा, तुम्हाला कळलेली ही विद्या इतरांपर्यंत पोहोचवून, तुम्हीही या परोपकराचे धनी बना. (समाप्त)
*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
982245773