नांदगावचा बालेकिल्ला शिवसेना अबाधित ठेवणार की, राष्ट्रवादी सुरुंग लावणार?

गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी प्रशासकीय राजवटीत राहिलेल्या नांदगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्वच उमेदवारांकडून प्रचाराला गती देण्यात आली. शिवसेना शिंदे गट आपला बालेकिल्ला अबाधित ठेवतो की, राष्ट्रवादी काँग्रेस सुरुंग लावून धोबीपछाड देण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नांदगाव नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा आता चांगला पसरू लागला आहे. आता प्रचाराला खर्‍या अर्थाने धार आली आहे. यंदाच्या निवडणुकीत लक्षवेधी बाब म्हणजे, राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्येच मुख्य लढत दिसून येत आहे. महायुतीमध्ये सत्तेत असणार्‍या शिवसेना (शिंदे गट), तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत.अर्थातच आमदार सुहास कांदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, तर समीर भुजबळांसाठी ही लढत अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नेते अन् नगराध्यक्षपदाचे उमेदवार

आ.सुहास कांदे     

समीर भुजबळ     

सागर हिरे     

  राजेश बनकर 

शिवसेनेकडून थेट नगराध्यक्षपदासाठी सागर हिरे यांच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेश बनकर यांना उमेदवारी देत शिवसेनेला आव्हान दिले आहे.
तसे पाहिले तर नांदगावची निवडणूक ही आता आमदार कांदे विरुद्ध भुजबळ कुंटुबीय यांच्याभोवतीच फिरू लागली आहे.
याआधीच 20 पैकी 7 नगरसेवक आमदार कांदे यांनी राजकीय डावपेच खेळत बिनविरोध काढत राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यात यशस्वी ठरले आहेत, असे असले तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील अजून हार मानली नसून उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार पंकज भुजबळही नांदगावमधील प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, तर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आमदार कांदे यांच्या सौभाग्यवती अंजुमताई कांदेदेखील पायाला भिंगरी बांधल्यागत प्रत्येक प्रभाग पिंजून काढताना दिसून येत आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी अधिक वेगाने सुरू आहे. काही प्रभागांमध्ये दुरंगी, तर काही प्रभागांत तिरंगी लढत रंगणार आहे. निवडणूक खूपच अटीतटीची होणार आहे.

माजी नगराध्यक्ष कवडे नाराज
सलग दोन टर्म नगराध्यक्ष राहिलेले राजेश कवडे शिवसेनेकडून (शिंदे गट) थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असताना, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता असतानाच ऐनवेळी सागर हिरे यांना थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन शिवसेनेने सर्वच पक्षांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने राजेश कवडे नाराज असल्याचे समजते. अपक्ष म्हणून थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कवडेसमर्थक नाराज झाले. ते काय निर्णय घेतात, यावर नांदगावचे राजकीय गणितदेखील अवलंबून आहे. खुद्द राजेश कवडे शिवसेनेच्या एकाही प्रचारफेरीत सहभागी झाल्याचे दिसून आलेले नाही. यामुळे त्यांच्या मनात चाललंय तरी काय? अशीदेखील चर्चा आहे.

प्रभागनिहाय उमेदवार
♦  प्रभाग 1- अ) : कल्पना जगताप (धनुष्यबाण) गौतमी मोरे (घड्याळ). 1 ब) वाल्मीक टिळेकर (धनुष्यबाण) कमलेश पेहरे (घड्याळ). ♦  प्रभाग 3 अ) : साक्षी आहिरे (घड्याळ), विद्या कसबे (धनुष्यबाण) रूपाली चोपडे (पंजा). 3 ब)- उल्हास कदम (घड्याळ), संतोष वाघ (मशाल), राजेश शिंदे (धनुष्यबाण). ♦  प्रभाग 5 अ) : सिंधूबाई देहाडराय (घड्याळ) स्नेहल पाटील (धनुष्यबाण). 5 ब )शेख सईद रशीद (धनुष्यबाण) योगेश सोनार (घड्याळ). ♦  प्रभाग 7 अ) : राहुल आहिरे (अपक्ष छत्री) बाळू शेवरे (धनुष्यबाण) पुंजाराम सूर्यवंशी (घड्याळ). 7 ब)रुपाली पाटील (धनुष्यबाण), दर्शना भगत सोनवणे (घड्याळ). ♦  प्रभाग 8 अ) : विष्णू देहाडराय (घड्याळ), पृथ्वीराज पाटील (धनुष्यबाण). ♦  प्रभाग 9 अ) : अनिल जाधव (घड्याळ), रोहित जाधव (पंजा), अजय थोरात (टीव्ही) निलो मुक्तार बेग (अपक्ष स्कूटर) सलीम गफ्फार बेग उर्फ शाखाभाई (अपक्ष बॅट),
काका सोळसे (धनुष्यबाण).9 ब) राखी जाधव (धनुष्यबाण), लहानूबाई थोरात (अपक्ष कपबशी), राणी सोळसे (घड्याळ). ♦  प्रभाग 10 अ) : सुनीता पगार (घड्याळ), गायत्री शिंदे (धनुष्यबाण). 10 ब) पांडुरंग गडाख (घड्याळ), काशीनाथ देशमुख (अपक्ष, रोडरोलर), विलास राजोळे (अपक्ष, कपबशी) संजय सानप (कमळ).

प्रचाराचा धुरळा सुरू

चिन्हवाटपानंतर आता खर्‍या अर्थाने निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. उमेदवार आता घरोघरी जाऊन पत्रके वाटप करणे, कोपरासभा घेणे आणि सोशल मीडियावरून आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *