महायुतीत मतभेद; भाजपा लढणार स्वतंत्र, तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र
त्रिंबक नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात लक्षवेधी ठरली आहे. सन 1854 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्याचे गाव म्हणून लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसतानादेखील नगरपरिषदेची स्थापना केली. देश-विदेशातून येथे भाविक येतील व त्यांच्यासाठी सेवासुविधा उपलब्ध करणे, हा त्यामागचा उद्देश होता. आता सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सुमारे पावणेदोनशे वर्षं वयोमान असलेल्या त्रिंबक नगरपरिषदेला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मागची तीन वर्षे प्रशासकीय कारभार सुरू होता. या कालावधीत सिंहस्थ आराखडे तयार करण्यात आले.त्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यापुढील तीन
आठवड्यांत लोकनियुक्त नगराध्यक्ष त्र्यंबक नगरीला मिळतील आणि विकासाचा गाडा अधिक वेगाने गतिमान होईल, अशी आस नागरिकांना लागली आहे.
त्रिंबक नगरपरिषदेत आता दहा प्रभाग आहेत व द्विसदस्य प्रभागात एकूण 20 सदस्य निवडले जातील. नगराध्यक्ष थेट मतदारांमधून निवडले जाणार आहेत. त्रिंबक नगरपरिषदेत यापूर्वी 17 सदस्य आणि एक नगराध्यक्ष होते. सन 2014 मध्ये शहराची हद्दवाढ झाली आहे. पूर्वीची 1.89 चौरस किलोमीटरची हद्द आता थेट 11 चौरस किलोमीटर झाली आहे. त्यात नवीन वसाहती वाढल्या आहेत. सन 1995 नंतर येथील अर्थचक्र गतिमान झाले. धार्मिक पर्यटनाने येथे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. साहजिकच येथे रोजीरोटीच्या निमित्ताने स्थिरावणार्या कुटुंबांची संख्या वाढते आहे.
समस्यांनी नागरिक त्रस्त
त्र्यंबकेश्वर शहरात मागच्या 17 वर्षांत प्रत्येक उन्हाळ्यात मार्च ते जूनदरम्यान एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दररोज नळाला येणारे पाणी जेमेतम अर्धा तास आणि कमी दाबाने असते. शहरातील बहुतांश पथदीप बंद असतात. रस्त्यांंची दुरवस्था झाली आहे. भुयारी गटारीच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही व त्यामुळे पावसाळ्यात सतत पूरपरिस्थिती निर्माण होते. रस्त्यांची उंची दरवेळेस सिमेंट काँक्रीटचे थर दिल्याने वाढली आहे. मंदिर आणि घराचे उंबरे रस्त्याच्या खाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट थेट मंदिरात व घरात येतात. शहराच्या साफसफाईबाबत नेहमीच तक्रार राहिली आहे. वाहनतळासह सर्वत्र कचरा साचल्याने शहराच्या नावलौकिकाला बाधा निर्माण होत आहे. कचरा डेपोची दुर्गंधी अर्ध्या शहराला त्रस्त करत आहे.
नगरपरिषदेची निर्मिती 1854 मध्ये
सन 2002 मध्ये शहराची मतदारसंख्या सहा हजारांच्या आसपास होती. ती आता या निवडणुकीसाठी थेट 12 हजार 835 इतकी झाली आहे. त्रिंंबक नगरपरिषदेची निर्मिती 1854 मध्ये झाली आहे. यातील सुरुवातीच्या 70 वर्षांची माहिती पुणे येथील प्राच्य माहिती संग्रहालयाकडे आहे. सन 1924 पासून पुढे झालेल्या नगराध्यक्षांची माहिती त्रिंबक नगरपरिषद कार्यालयात फलकावर लिहिली आहे. यात सन 1924 मध्ये नगराध्यक्ष म्हणून चंदुलाल वीरचंद गुजराथी होते, असे यावरून लक्षात येते. आतापर्यंत तीन नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून आले आहेत. यात दामोदर पांडुरंग लोणारी (सन 1974), पुष्पाताई मोहन झोले (सन 2003), आणि पुरुषोत्तम लोहगावकर (सन 2017) यांचा समावेश आहे.
विकासकामांची संधी
त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थाच्या निमित्ताने भरीव स्वरूपात विकासकामे होत असतात. मात्र, अलीकडच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या नगरविकासाच्या विविध योजनांचे अनुदान मिळते, तसेच तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन या माध्यमातूनदेखील विकासकामांची संधी प्राप्त होत असते. त्याअनुषंगाने भाविक पर्यटकांना आवश्यक असलेल्या व पर्यटनवाढीला चालना देणार्या विकासकामांसाठी निधीची गंगा येथे सतत वाहते आहे. मात्र, तरीदेखील नागरिकांना व भाविकांना मूलभूत सुविधा मिळवताना होणारी उपेक्षा चिंतनीय आहे.