रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा
विंचूर : प्रतिनिधी
विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विंचूर- गोंदेगाव रस्त्यालगत वसाहतींचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी अक्षरश: विद्रूप झाला होता. सरपंच सचिन दरेकर व ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब जेऊघाले यांनी ठाम भूमिका घेऊन पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 35 लाख रुपये खर्च करून साडेतीनशे मीटरचा सिमेंट काँक्रिट रस्ता तयार होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे.
गोंदेगाव रस्त्यालगत अनेक वसाहती असून, दिवसेंदिवस नवीन वसाहती तयार होत आहेत. नववसाहतीत मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचार्यांनी घरे बांधली आहेत. रस्त्यालगतच जिल्हा परिषदेची शाळा, पुंड, राऊत, दरेकर, खैरे, चव्हाण यांसह अनेक वस्त्या आहेत. मोठे दूध संकलन केंद्र असल्याने शेकडो दुग्ध व्यावसायिकांचीही रस्त्यावरून कायम वर्दळ असते. मात्र रस्त्याची बिकट अवस्था असल्याने रस्त्यावरून ये जा करताना स्थानिकांसह गावातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.
विशेषतः वॉर्ड क्रमांक चार व पाचमधील शेकडो कुटुंबांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी मांडत होते. नागरिकांची अडचण बघता सरपंच दरेकर व ग्रामपंचायत सदस्य जेऊघाले यांनी या रस्त्यासाठी ग्रामपालिकेचा 15 वा वित्त आयोगाचा निधी वापरण्याचा प्रस्ताव मांडला. वादावादी व काहीअंशी विरोधाला सामोरे जात शेवटी सर्वांना विश्वासात घेत हा मार्ग तयार झाल्याने आकाशनगरसह परिसरातील नववसाहतींचा चेहरामोहरा बदलला आहे.
उशिरा का होईना विंचूरच्या गोंदेगाव रस्त्यालगत समृद्धी महामार्गासारखी झलक पाहावयास मिळत असून, या भागाला एक नवा आयाम मिळाल्याने आनंददायी प्रवास होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या मार्गी लागल्याचा आनंद आहे. पावसाळ्यात तर गाळातून प्रवास करावा लागत होता. भव्य सिमेंट काँक्रीट रस्त्यामुळे सुटसुटीत व सोयीस्कर प्रवास होणार आहे.
-नितीन गायकवाड, आकाशनगर, विंचूर