मुंडेंशिवाय कार्यक्रम यशस्वी होणे नाही

खा. प्रीतम मुंडे यांचा विश्‍वास

नाशिक : प्रतिनिधी

राज्यात कुठेही राजकीय कार्यक्रम असो, गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय कार्यक्रम यशस्वीच होऊ शकत नसल्याचे विधान खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. दरम्यान, त्यांच्या या विधानाचा संबंध नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या सभेवरून लावला जातोय. या सभेत निम्म्याहून खुर्च्या रिकाम्या होत्या, तर अनेकांनी चालू कार्यक्रम सोडला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमापासून पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याची कुजबूज मुंडे समर्थकांमध्ये होती.

नाशिकमध्ये रविवारी (दि.8) एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व खा. प्रीतम मुंडे एकाच व्यासपीठावर होते. याचवेळी खा. मुंडे यांनी हे विधान केल्याने राजकीय अर्थ जोडला जात आहे. दरम्यान गेल्या काही कालवधीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपकडून बाजूला सारले जात असल्याची चर्चा मुंडे समर्थकांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमपत्रिकेत पंकजा मुंडेे यांचे नाव टाकले नव्हते. शिवाय त्यांना बोलण्यासाठी दोन मिनिटे दिल्याने मुंडे समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. हाच धागा पकडून खा. मुंडे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे बोलले जात आहे. भाजपातील एक गट माजी मंत्री पंकजा मुंडे यांना व खा. प्रीतम मुंडे यांना जाणूनबुजून साइड ट्रॅकला टाकत असल्याची कुजबूज आहे. विधान परिषदेत पंकजा मुंडेे यांना डावलल्यानंतर केंद्रात खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना तेथेही केंद्रीय स्तरावर मुंडे यांना टाळून भागवत कराड, डॉ. भारती पवार यांना मंत्रिपद देण्यात आले.

यावरूनच भाजपला मुंडे भगिनी नकोशा झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. रविवारी एकाच व्यासपीठावर ना. कराड व खा. मुंडे हे दोघेही होते. यावेळी मुंडे यांनी भाजपात आता सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास हे धोरण राबवले जात आहे. परंतु चाळीस वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी हे धोरण राबविले. आपण भाग्यवान आहोत. मुंडेंच्या घरी जन्माला आलो, तसेच ताई वार खायला आणि आपण मलाई खायला, असेही  विनोदाने खा. मुंडे यांनी म्हटले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *