पारोळा :
एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह काटेरी झुडपात फेकून देण्यात आल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी या महिलेची हत्या करण्यात आल्याची कबुली संशयिताने दिली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगावच्या पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील रहिवासी शोभा रघुनाथ कोळी (वय 48) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अनिल गोविंदा संदानशिव (वय 45) आहे. दरम्यान, डोक्यावर व तोंडावर दगडाने वार करून गळा आवळून जीवे ठार मारत शोभा कोळी यांचा चेहरा प्लास्टिक गोणीत झाकून झुडपामध्ये टाकण्यात आला होता. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली होती.