पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार

बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले

पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार

 

नाशिक :प्रतिनिधी

पंचवटी परिसरातील रामवाडी येथील चौघुले पेट्रोल पंपामागील मोकळ्या जागेत एका युवतीवर  अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने पतीच्या भावाने मित्रांच्या मदतीने हा अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या पीडित युवतीने दुसऱ्या दिवशी या नराधमाच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घेत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एम. आय. डी. सी. सुभाषनगर, अंधेरी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीने विकास विष्णू गायकवाड, २८ रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, मुलीचे वय कमी असल्याने विकास गायकवाड यांच्याविरोधात एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सध्या तो आर्थररोड कारागृहात बंद आहे. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी विकास याचा मोठा भाऊ दिलीप विष्णू गायकवाड, २८, रा. सिद्धार्थ नगर, कॉलेजरोड, बजरंगवाडी, नाशिक पीडित युवतीला फोन करून नाशिकला बोलावले होते. आपल्या पतीला जेलमधून बाहेर काढायचे असल्याने पीडित हिने बुधवार दि. २२ रोजी सकाळी साडेआठ वाजता नाशिक गाठले. यावेळी शालीमार येथे दिलीप गायकवाड, मित्र गोप्या आणि अजून एक संशयित असे तिघे पीडित युवतीला भेटले. त्यांनी तिला रिक्षामध्ये बसवून जामीनदार असलेल्या व्यक्तीशी भेट घालून देतो असे सांगत रामवाडी परिसरातील चौघुले पेट्रोल पंपामागे असलेल्या गव्हाच्या शेतालगत असलेल्या मोकळ्या जागतील झाडाझुडपांमध्ये घेऊन गेले. यावेळी या तिघांनी काहीतरी नशा केली. यावेळी त्यांनी जेवायला सांगितले मात्र, युवतीने जेवण्यास नकार दिल्याने तिला एका झाडाला बांधून ठेवण्यात आले.
त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिघांपैकी एका संशयिताने पीडित तरुणीच्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्यानंतर दिलीप गायकवाड याने पिडीत युवतीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. यावेळी इतर दोघा संशयितांनी तिचे हातपाय धरून तिला मारहाण करीत होते. या अत्याचाराने पीडित युवती बेशुद्ध झाली. गुरुवार दि. २३ रोजी सकाळी साडेसात वाजता पीडित शुद्धीवर आली असता तिला बोलता व चालता येत नव्हते. यावेळी पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा या तिघांनी दिला मारहाण केल्याने पीडित युवती पुन्हा बेशुद्ध झाली. दुपारी साडेचार वाजेपर्यंत पीडित युवतीला हे नराधम मारहाण करीत होते. त्यानंतर हे तिघे संशयित दारू पीत बसले असता पीडितेने त्यांना वॉशरूमला जायचे असल्याचे सांगितले. यावेळी यातील एक संशयित पिडीत युवतीसोबत गेला. याचाच फायदा घेत पीडितेने या संशयिताला धक्का देत घटनास्थळावरून पळ काढत नाशिकरोड गाठले आणि पोलीस ठाण्यात या तिघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला. नाशिकरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करून घेत तो पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *