काठीने मारहाण करत महिलेचे मंगळसूत्र लुटले

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर आणखी लुटमारीच्या घटना उघड

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
संत निवृत्तिनाथ यात्रा कालावधीत ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची लूटमार झाल्याची आणखी एक घटना समोर आली. याबाबत सुनीता अशोक कोल्हे (वय 53, रा. शिवाजीनगर, संगमनेर) यांनी गुरुवारी (दि. 22) फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर येथील फिर्यादी महिला, तिचा मुलगा आणि बहीण व जाऊबाई असे चौघे 13 जानेवारीला रात्री 9 च्या सुमारास ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास निघाले, ते 14 जानेवारीला रात्री एकच्या सुमारास गौतमऋषींचे दर्शन घेऊन पायर्‍या उतरून येत होते. त्यांना तेथे बसलेल्या सहा अज्ञातांनी त्यांच्या मागे चालत येऊन काठीने हातावर मारले व फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 16.5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. या झटापटीत चोरी करणार्‍यांचे दोन मोबाइल आणि घड्याळ तेथे पडले. त्याच वेळेस तेथे काही यात्रेकरू आले व संशयित सहाही जण पळाले.
या प्रकाराने घाबरलेल्या महिलांनी त्र्यंबकेश्वर गाठले आणि तक्रार न देता गावी परत गेल्या. याबाबत 22 जानेवारीला फिर्याद दाखल केली. घटनास्थळावर मिळून आलेले संशयितांचे मोबाइल आणि घड्याळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. पोलिसांनी सीमकार्डच्या सहाय्याने मोबाइल क्रमांक शोधले आहेत. तसेच संशयितांच्या वर्णनावरून घोटी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सहा संशयितांची ओळख पटवण्यात येणार आहे. आणखी कोणाही भाविकांची लूटमार झालेली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. घोटी पोलिसांत दाखल असलेली घटना 15 जानेवारीची आहे. त्र्यंबक पोलिसांत दाखल झालेली घटना 14 जानेवारीची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर 12 जानेवारीपासून भाविकांचा ओघ सुरू झाला होता. पायी दिंडीने आलेले आणि वाहनांनी आलेले वारकरी भाविक या कालावधीत प्रदक्षिणेला जात असतात, याची पूर्वकल्पना असल्याने मध्यरात्रीनंतर या मार्गावर दबा धरून लूटमार करण्याचे सत्र सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये आणखी काही घटना समोर येतील, असे दिसून येते. पोलिसांनी याबाबत कसून तपास करावा आणि भाविकांची लूटमार करण्याच्या गैरप्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.

Woman’s mangalsutra robbed after being beaten with a stick

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *