नाशिक : विशेष प्रतिनिधी
पती मृत झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर रेल्वेमध्ये सफाई कामगार म्हणून लागलेल्या महिलेला सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या 20 लाखांची रक्कम अशिक्षितपणाचा फायदा घेत मुलगी, जावई व नातवाने परस्पर हडप करण्याची घटना नाशिकरोडमधील जयभवानी रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कृष्णा राजेश चंडालिया, जावई राजेश श्यामलाल चंडालिया व नातू सागर राजेश चंडालिया अशी आरोपींची नावे आहेत. श्रीमती प्रमिला रमेश मैना (वय 65, रा. कमला पार्क, फर्नाडिसवाडी, जयभवानी रोड, नाशिक रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या अशिक्षित असल्याने मुलगी कृष्णा हिने 2016 मध्ये सही कशी करायची ते शिकवले होते. त्या 30 जून 2020 मध्ये रेल्वेतून निवृत्त झाल्यावर त्यांना 20 लाख रुपये मिळाले होते. ते कॅनरा बँकेत जमा करण्यात आले होते. त्यावेळी मुलगी कृष्णा चंडालिया, जावई राजेश व नातू सागर यांच्यासोबत त्या एकत्र कुटुंबात राहत होते. सन 2022 मध्ये जावई राजेश याला एक लाख रुपयाची गरज असल्याने त्याने पैशांची मागणी केली. तेव्हा त्यास बँकेतून पैसे काढुन देते असे सांगितले होते. तेव्हा त्याने मला सांगितले की, तुमचे पैसे फिक्समध्ये टाकले असून, ते काढता येणार नाहीत. त्यांनतर तक्रारदार या एक दिवस बँकेत पेन्शन घेण्यास गेल्या असता, बँकेमधील कर्मचार्याला खात्यातून एक लाख रुपये काढता येतील का, असे विचारले. त्याने मला सागितले की, तुमच्या खात्यात एक लाख रुपये नाहीत. तेव्हा ही बाब त्यांनी मुलगी कृष्णा हिला सांगितली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली व भांडण करून आईला घराच्या बाहेर काढून दिले.
तेव्हापासुन त्या मोठी मुलगी किरण चंडालिया हिच्यासोबत राहत आहेत. त्यानंतर मुलगी किरण हिच्यासोबत कॅनरा बँकेत जाऊन बँक स्टेटमेंट काढले. ते वकिलाकडे दिले असता वकिलाने सांगितले की, तुमच्या खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा केले असून, काही पैसे चेकद्वारे काढले आहेत. तेव्हा तक्रारदाराच्या लक्षात आले की, मुलगी कृष्णा, जावई राजेश व नातू सागर यांनी माझा विश्वास संपादन करून अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत कॅनरा बँक नाशिकरोड येथील माझ्या खात्यातून वेळोवेळी संमतीशिवाय वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. उपनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कोरपड तपास करत आहेत.