महावितरणकडून मीटर बदलण्याचे काम सुरू

बिनचूक, थेट मीटर रीडिंगसह अनेक बाबी ग्राहकांसाठी सुलभ होणार

निफाड : विशेष प्रतिनिधी
वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 46 (5) नुसार मीटर वापरासंबंधी स्वातंत्र्य आणि ग्राहकांना निवड करण्याच्या कायदेशीर हक्काचे निफाड तालुक्यात खुलेआम उल्लंघन होत आहे. महावितरणकडून जाणीवपूर्वक ‘चुपके चुपके‘ मीटर बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्राहकाला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्वसूचना न देता जुने चालू असलेले मीटर बदलून स्मार्ट मीटर लावून ग्राहकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे वीजग्राहकांत असंतोष निर्माण होत आहे.
स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याच्या योजनेला अनेक जिल्ह्यांत अनेक संघटनांनी जनआंदोलन करून विरोध दर्शविला आहे. आजघडीला ही मीटर प्रणाली शासन दरबारी आणि महावितरण कंपनीच्या इमारतीमध्ये सुरू असताना देशातील अनेक राज्यांतील, महाराष्ट्रासकट जिल्ह्यातील अनेक गावांत कोणत्याही प्रकारची लेखी, मौखिक पूर्वसूचना न देता चोरपावलांनी हे मीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 46 (5) नुसार मीटर वापरासंबंधी स्वातंत्र्य आणि निवड करण्याच्या कायदेशीर ग्राहक हक्काला बगल देऊन मीटर लावण्याचा गैरप्रकार खुलेआम सुरू आहे. याकडे शासन, प्रशासन आणि निवडणुकीच्या हंगामात मोठ-मोठे बॅनर लावणारे यांपैकी कुणीही लक्ष देण्यास सध्या तयार नाही, असा जनतेकडून आरोप होऊ लागला आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे महावितरणाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ग्राहकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडे करावी, असाही सवाल आता ग्राहकांत उपस्थित होऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *