मालेगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणार्या सर्व आस्थापनांना लागू राहणार असून, सुट्टी अथवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. 15 जानेवारीला मतदान होत आहे. मतदानाची घटती टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मतदार जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी कामातील व्यस्थतेमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात. लोकशाही बळकटीसाठी मतदान हे प्रभावी हत्यार असल्याने प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी शासन व निवडणूक प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी संस्था, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी ठिकाणी कार्यरत मतदार कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देणे बंधनकारक केले आहे. आस्थापनांच्या मालकांनी कामगारांना सुट्टी देऊन आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले असून सुट्टी किंवा सवलत न दिल्याने कुणी मतदानापासून वंचित राहिल्याची तक्रार झाल्यास संबंधित मालकावर कारवाई केली जाईल.
अपवादात्मक परिस्थितीत कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका असल्यास, लोकोपयोगी सेवा किंवा अत्यावश्यक आस्थापनांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे अनिवार्य आहे. यासंदर्भात आस्थापना मालकांनी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.