जखम हाताला; उपचार पायाला!

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे गुळवंचच्या रुग्णाला अपंगत्व

नाशिक : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील प्रकाश काकड यांच्या हातावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने जखमी काकड यांच्यावर शहरातील वेदांता हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेंद्र नेहेते यांच्याकडे उपचार झाले. मात्र चुकीच्या शास्रक्रियेमुळे पायाला कायमचे अपंगत्त्व आले असून डॉक्टरवर गुन्हा दाखल करून चौकशी व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काकड उपोषणाला बसले आहेत. दरम्यान याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी देखील याप्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच प्रहार पक्ष काकड यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.
काकड यांच्या हातावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने दुखापत झाली असता नाशिक येथील वेंदात हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेंद्र नेहते यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. त्यांनी तीन शस्रक्रिया केल्यात. यात पहिली शस्रक्रिया 03 एप्रिल 2020, दुसरी 19 एप्रिल 2023 आणि तिसरी 21 एप्रिल 2023 रोजी शस्त्रक्रिया केल्या. त्यासाठी त्यांनी पायाच्या नसा काढल्या मात्र यामुळे पायाला कायमचे अपंगत्व आले. तसेच हाताला असणारा त्रास तसाच राहिला. त्यात आणखी पायाच्या आजाराची भर पडली. असह्य वेदनांनी जीवन नकोसे झाले आहे. डॉक्टरांकडे उपचारासाठी पुन्हा गेल्यानंतर ते हात झटकून मोकळे झाले. डॉ. नेहते यांच्याकडून जर यशस्वी उपचार होणे शक्य होणार नव्हते तर त्यांनी विश्वास देत तीन-तीन शस्त्रक्रिया करण्यास का सांगितले? या वेदनादायी जीवनाला जबाबदर कोण? आर्थिकदृष्ट्या कंगाल झालोय. मात्र माझ्यावर जी वेळ आली ती अन्य कोणावर येऊ नये. यासाठी संबंधित डॉक्टरवर सदोष व निष्काळजीपणाने उपचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. याप्रकरणी त्याची चौकशी व्हावी, यासाठी हा लढा आहे. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टरवर गुन्हा दाखल होऊन चौकशी होत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे काकड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *