यशोदा

अनाथाश्रमात जाऊन आल्यापासून मन सुन्न झालं होतं आणि मनात विचारांचं वादळ उठलं होतं अगदी एक दिवसाच्या बाळापासून ते आठ वर्षांपर्यंतच्या बालकांना पाहून मन हळवं झालं होतं. जास्त हृदय तेव्हा पिळवटून निघाले जेव्हा अगदी छोटी एक दिवसाची बाळं पाहिली. मनात विचार आला की आई सुद्धा निष्ठुर असू शकते इतकी!
गरिबी, कौटुंबिक अडचणी, तारुण्याची खाज किंवा कुठलीही परिस्थिती असू शकते बाळं किंवा छोटी मुलं अनाथाश्रमात सोडण्याची. पण एक सांगू का जर आपल्याला कुणाला आनंद नाही देता आला तरीही चालेल; पण एखाद्याच्या वाट्याला आयुष्यभराचं दुःख तरी देऊ नये. आई होणं परमेश्वराचं स्त्रियांना दिलेलं खूप सुंदर वरदान आहे. नवीन जीव निर्माण करण्यात स्त्रियांचा महान वाटा आहे. स्वामी विवेकानंदांना एकदा एका गृहस्थाने प्रश्न केला की, आईची महती इतकी का गायली जाते? यावर स्वामी विवेकानंदांनी त्या गृहस्थाला एक दगड आपल्या पोटाला बांधून फक्त एक दिवस सर्व काम करण्यास सांगितले. आणि त्या गृहस्थाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. समाजात चालू असलेल्या प्रकारावरून आई होणं अभिशाप वाटतो. जेव्हा नुकतेच जन्मलेले बाळ अनाथाश्रमात पाहण्यासाठी मिळतात तेव्हा!
खरं प्रेम नक्की कशात आहे हे इथं गेल्यावर समजते. सगळं असूनही आपण कधीच समाधानी नसतो. पण या मुलांना पाहून खूप शिकण्यासारखे आहे की, त्यातला सर्वोत्तम गुण म्हणजे समजूतदारपणा. परिस्थितीबरोबर दाखवलेला तोही अगदी कमी वयात! वायालाही लाजवेल इतका अनुभव जीवन या लहानग्यांच्या वाट्याला देतं. तिथल्या सांभाळ करणार्‍या स्त्रियांना यशोदाच म्हणावं लागेल. यशोदा होणं अवघडच आहे. जन्म झाल्यावर देवकीपासून दूर गेल्यावर कृष्णाचं संगोपन कसे केले हे फक्त यशोदेला माहीत. जेव्हा मी तिथल्या एका यशोदा आईला विचारलं की, चार-पाच वर्षांच्या या मुला-मुलींना तर आई-वडील कळतात, मग यावर तुमचं उत्तर काय असते. यावर त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं अन् आमचेही डोळे भरून आले. स्वतः धीर सांभाळून त्या म्हणाल्या की, भावना जपणं फार अवघड आहे. आम्ही समजूत काढतो. येतील असे ही सांगतो. खेळण्यात रमवतो इ. गोष्टींमध्ये व्यस्त ठेवतो.पण असं म्हणतात ना ढळाश कशरश्री र्एींशीूींहळपस वेळ प्रत्येक जखम भरून काढते. कालांतराने मुलं ही विसरून जातात आणि रमवतात स्वतःला. कारण देवानं त्यांच्यासाठी पालनपोषण करणारी यशोदा आईला निवडलेले असतं. त्यांच्या संगोपनासाठी. खरंच आपण आपल्या पाल्याचा विचार करतो पण ह्या यशोदा स्वतःच्या मुलांना जाणीवपूर्वक दूर ठेवून अनाथांची आई होताना दिसतात. अनाथांची यशोदा होण्याचं शिवधनुष्य त्या रोज पेलताना दिसतात तेही यशस्वीपणे!
कोरोनाकाळात या अनाथाश्रमात कुणाला काहीच झाले नाही; कारण जे निरपेक्ष निरागस आहे त्यांच्या आयुष्यात कुठलंही संकट आले तरी भगवंत ते त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाही. जेव्हा मी त्यांना प्रश्न केला की, तुमची मुले नाही का हट्ट करत की, आई तू इतका वेळ अनाथाश्रमात देते, पण सांगू का हे सांगताना त्यांच ऊर भरून आले. अभिमानाने त्या म्हणाल्या की, आम्हा यशोदापेक्षा आमची मुले जास्त समजूतदार आहेत. या उत्तराने आम्ही स्तब्ध झालो होतो. यावर वि. दा. करंदीकर यांच्या कवितेतील ओळ आठवली. देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे। जेव्हा घरातील मोठी माणसं काही चांगले काम करतात ना निःस्वार्थपणे त्यावेळी त्यांच्या घरातील लहानगेही त्यांच्या ठायी असलेली सात्त्विक विचार स्वीकारतात हे त्यांना शिकवावं लागत नाही. जेव्हा देव एखादी गोष्ट आपल्याकडून काढून घेतो ना तेव्हा तो आपल्याला खूप काही चांगलं देणार असतो जे आपल्यासाठी योग्य असतं. फक्त हे आपल्यालाच कळत नसतं. जन्मदात्यापेक्षाही ज्या दाम्पत्याला मुलं नाहीत अशी दाम्पत्य या बालकांना त्यांच्या जन्मदात्याचीही आठवण येऊ देत नाही. तोपर्यंतचा यशोदांचा प्रवास वंदनीय आहे. खरंच अनाथ बालकांवर निःस्वार्थ माया करणार्‍या या सर्व यशोदांना माझा मनापासून नमस्कार!
-श्रद्धा बोरसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *