महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, राष्ट्रीय राजकारणातले द्रष्टे नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आज (दि. 25 नोव्हेंबर) स्मृतिदिन. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 ला सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. उच्चशिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. पुण्यात त्यांनी बी.ए.,एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.
महात्मा गांधींच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. 1930 साली त्यांनी गांधीजींच्या सविनय आंदोलनात भाग घेतला. 1932 मध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1942 च्या चले जाव आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1946 च्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळ निवडणुकीत दक्षिण सातारा मतदारसंघातून ते निवडले गेले आणि संसदीय मंडळाचे चिटणीस बनले. 1948 मध्ये यशवंतरावांची काँग्रेसच्या चिटणीसपदावर निवड झाली. 1952 च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य संस्था व पुरवठा खात्याचे मंत्री बनले.द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी सूत्रे हाती घेतली. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1 मे 1960 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक उपक्रमांना चालना दिली. महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणतात. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले. अशावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून त्यांची देशाच्या संरक्षणमंत्रिपदी नेमणूक केली. देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. चिनी आक्रमणानंतर संरक्षण दलात चैतन्य आणण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पेलली.
सन 1967 च्या निवडणुकीत अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या काळात देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीत त्यांनी गृहखाते यशस्वीरीत्या सांभाळले. अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. बांगलादेशाचे युद्ध, दुष्काळ यामुळे खालावलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी चालना दिली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे यांसारखे महत्त्वाचे निर्णय ते अर्थमंत्री असतानाच घेतले गेले. चलनवाढीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे धोरण त्यांच्याच काळात आखण्यात आले. देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. पुढील काळात देशाच्या उपपंतप्रधानपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. देशात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
महाराष्ट्राचे भाग्यविधाते, कार्यक्षम मंत्री, उत्तम संसदपटू, उदारमतवादी नेते, अशी जनमानसांत त्यांची प्रतिमा निर्माण झाली. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात त्यांनी मानाचा तुरा रोवला.
यशवंतराव जितके महान नेते होते तितकेच ते अभिजात साहित्यिकही होते. ललित, आत्मचरित्र, चरित्रात्मक लेख, व्यक्तिचित्रणपर लेख, प्रवासवर्णन, स्फुटलेखन, वैचारिक लेख, समीक्षात्मक लेख, पत्रलेखन भाषणे आदी स्वरूपात त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या कृष्णाकाठ, ऋणानुबंध, युगांतर, भूमिका, शिवनेरीच्या नौबती, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे या ग्रंथांतून त्यांच्या लेखन प्रतिभेचा परिचय होतो. ते जरी राजकारणी असले, तरी त्यांच्यामधील चिंतनशील रसिक, सामाजिक विचारवंत हा मात्र साहित्याबरोबरच राहिला होता. त्यांच्या सर्व कलाकृती लक्षवेधक आहेत.
यशवंतराव चव्हाण हे खर्या अर्थाने लोकनेते होते. भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान अद्वितीय असेच आहे. महाराष्ट्रासाठी तर त्यांचे योगदान अनमोल असेच आहे. महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीही विसरू शकत नाही. 25 नोव्हेंबर 1984 ला त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन!