अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे 30 दिवसात साडेअठ्ठावीस लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन
नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 134 विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एवढी मोठी संख्या असतानाही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अचूक मूल्यांकन पद्धतीमुळे परीक्षेनंतर केवळ 30 दिवसांत निकाल तयार करण्याचा अनोखा विक्रम विद्यापीठाने केला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख व परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी दिली.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या होत्या. दिनांक 24 जून ते 24 जुलै दरम्यान झालेल्या या परीक्षांना 5 लाख 45 हजार 638 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विविध 134 शिक्षणक्रमांच्या परीक्षेनंतर 27 लाख 56 हजार 854 उत्तरपत्रिका महिनाभरात तपासून निकाल जाहीर करण्याची मोठी जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर होती. तथापी अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धती आणि त्यातून ऑनलाईन मूल्यांकन पद्धती काटेकोरपणे राबवण्यात आली. ऑनलाईन पेपर तपासणीसांच्या फेस डिटेक्शन आणि बायोमेट्रीक ऑथेन्टीकेशनसह अतीशय बारकाईने काळजी घेण्यात आली होती. गुणांकन पद्धतीही ऑनस्क्रिन करण्यात येऊन त्याचे अंतिम डीजीटल मूल्यमापन करण्यात आले. यामुळे तब्बल साडेपाच लाख विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या साडे अठ्ठावीस लाखावर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केवळ एक महिन्यात करून निकाल ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणारे मुक्त विद्यापीठ हे केवळ विद्यार्थीसंख्येच्याच बाबतीत नव्हे, तर काळासोबत चालताना उच्च तंत्रज्ञानाचा उत्तमरित्या वापर करणारे आदर्शवत विद्यापीठ ठरते आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षणक्रमांच्या निकालासाठी विद्यापीठाच्या ुुु.ूर्लोी.रल.ळप अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी केले आहे.