मधुरा घोलप
आर्यन धावत धावत शाळेतून घरी आला. खूप आनंदात दिसत होता. बूट काढून, दप्तर सोफ्यावर भिरकावतच लगेच आईला म्हणाला, आई, खूप भूक लागलीये. काहीतरी खाऊ दे ना. आईने केलेलं गरमागरम थालीपीठ खातानासुद्धा आर्यनचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. आई म्हणाली, आज एकदम खुशीत दिसतेय स्वारी! शाळेत काहीतरी विशेष घडलेलं दिसतंय.आर्यन म्हणाला -अगं आई, 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची सूचना मिळाली वर्गात.
मग काय विशेष करणार आहात त्या दिवशी? तुझ्या मनात काही योजना आहेत का? आईने विचारलं.
अगं, त्या दिवशी सुट्टी असते ना! म्हणून रेणुका तिच्या बाबांबरोबर मुंबईला जाणार आहे. वैभव गावी जाईन म्हणाला. विक्रांत आणि सईसुद्धा पुण्याला आई-बाबांबरोबर फिरायला जाणार आहेत. ए आई, आपणही काढूया ना गं एखादी छोटीशी सहल! पावसाळ्यात धबधबा बघताना काय मजा येते!- इति आर्यन.
आई आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली. तिने शाळेतल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाची योजना विचारली होती; पण अमितच्या डोक्यात काहीतरी भलतंच होतं. त्याने हट्ट करून, रडून गोंधळ घालू नये म्हणून आईने नुसतीच मान डोलावली.
आवडती थालीपीठं खाऊन आर्यन मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला गेला. पण बाहेर खूप जोराचा पाऊस पडत असल्याने सगळे आडोशाला उभे राहून विचार करू लागले. शेवटी आर्यनच्या घरीच बैठे खेळ खेळायचं ठरलं. मग सगळी वानरसेना आर्यनच्या खोलीत शिरून बघते-तर काय! सगळ्या भिंतींवर नेत्यांची, क्रांतिकारकांची, शूरवीरांची, सैनिकांची चित्रं लावलेली होती. स्टडीटेबलवर वैभवला काही पुस्तकं दिसली. त्याने ती सगळ्यांना वाटली. सगळेजण ती पुस्तकं चाळत असतानाच आईचा आवाज आला, बाळांनो, खोली किती छान दिसतेय ना? आज ना मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आपल्या भारत देशातल्या अनेक महान व्यक्तींची तुम्हाला थोडक्यात ओळख करुन देणार आहे.
आज आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळणार या उत्सुकतेने ती ऐकायला सगळेजण सरसावून बसले. आईने एका चित्राकडे बोट दाखवून विचारलं- मयांना आपण सगळेच ओळखतो! कोण,सांगा बरं? मछत्रपती शिवाजी महाराजफ -सगळे एका सूरात अगदी जोशात म्हणाले. महाराजांचा इतिहास शिकलोय आम्ही. ते खर्या अर्थाने रयतेचे राजे होते. विक्रांत अतिशय आदराने आणि अभिमानाने म्हणाला.
शाब्बास! अगदी बरोबर! शिवरायांचाच आदर्श आपल्या क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी घेतला, बरं का! आई पुढे म्हणाली, हे आहेत लोकमान्य टिळक. त्यांनी इंग्रजांविरुद्ध सर्व मार्गांनी लढा दिला. त्यांच्या लेख, व्याख्यानांनी भारतीय समाजात जागरूकता निर्माण झाली. आपण आज शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतो ना, ते टिळकांनीच सुरू केले. या उत्सवांमुळे त्या काळी सगळे लोक एकत्र येऊन देशकार्यात सहभागी होत असत.फ
मग रमाने खड्या आवाजात टिळकांची प्रसिद्ध घोषणा म्हटली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मतुमच्याकडे असलेल्या पुस्तकांत दिलेली थोरपुरुषांची माहिती एकेकाने वाचा बघू.- आई. मग प्रत्येकाने वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी, म. गांधीजी, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर नेते आणि क्रांतिकारकांची गाथा वाचून दाखवली. आपल्या पूर्वजांनी गाजवलेला पराक्रम वाचताना सर्वांचीच छाती अभिमानाने फुलून येत होती आणि देशासाठीचा असीम त्याग जाणून घेताना या महान देशभक्तांविषयी मनात कृतज्ञता दाटून येत होती. आईने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चित्राकडे बोट दाखवताच सई म्हणाली, मकाकू, मी सांगते- क्रांतिकारकांचे मेरुमणी असलेल्या स्वा. सावरकरांबद्दल. मित्रांनो, जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला अशा अजरामर कविता रचणारे सावरकर हे खूप मोठे देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या सशस्त्र क्रांतीमुळे त्यांना 2 जन्मठेपांची म्हणजेच 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर झाली.
50 वर्षं हा शब्द ऐकून सगळे थक्क होऊन एकमेकांकडे पाहू लागले. मअंदमानात क्रांतिवीरांनी खूप कष्ट भोगले. कोलू ओढला, काथ्या कुटला. खडीबेडी, दंडाबेडीसारख्या भयंकर शिक्षा सहन केल्या. हे सर्व ऐकताना मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते आणि डोळे भररून येत होते.
न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, राजा राममोहन रॉय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक नेते आणि समाजसुधारकांनी समाजातल्या अनिष्ट रूढी-परंपरा आणि भेदभाव नष्ट करुन सगळा समाज एकत्र येण्यासाठी केलेले प्रयत्न आणि हे करताना त्यांना सोसावे लागलेले कष्ट असं सारं सारं जाणून घेताना या सगळ्यांविषयी मुलांच्या मनात असलेला आदर कित्येक पटींनी वाढत होता.
आई म्हणाली, तर अशा प्रकारे आपल्या भारतीय स्वातंत्र्ययज्ञात लाखो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणून आपला देश स्वतंत्र झाला. तसंच कित्येक समाजसुधारकांनी सामाजिक एकता निर्माण केली म्हणूनच आपला देश प्रगती करु शकला.
आणि हो, आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत,ते कसलीही पर्वा न करता सीमेवर देशरक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या आपल्या शूरवीर भारतीय सैनिकांमुळेच!फ चर्चा ऐकत उभ्या असलेल्या मुलांच्या लाडक्या मुक्ताताईने नवी माहिती पुरवली. हे ऐकून या बालवीरांनी शूर भारतीय जवानांना आणि सर्व महापुरुषांना वंदन केलं.
आर्यन म्हणाला, आई, आमचं चुकलंच. आता 15 ऑगस्टला सहलीला न जाता आम्ही शाळेत झेंडावंदन करू. रेणुका म्हणाली- हो हो. भारतमातेला वंदन करून, ज्यांनी भारत देश घडवला त्यांचं स्मरण करू.
आमच्या सगळ्याच मित्रमैत्रिणींना स्वातंत्र्याचं आणि स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व समजावून सांगू!- सगळ्यांनीच दुजोरा दिला.
ए, आपण ना एखादी छान नाटिका करु यावरफ – वैभवने प्रस्ताव ठेवला. महो हो आणि मी भाषण करेन.फ -इति रमा. मआणि मी देशभक्तीपर गीत सादर करेन.-सईने जाहीर केलं.
सगळी वानरसेना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनात दंग झाली आणि आई मुक्ताताईसह त्यांच्याकडे कौतुकाने पाहत राहिली.
मागे रेडिओवर गाणं वाजत होतं- आओ बच्चो, तुम्हें दिखाए झॉंकी हिंदुस्तान की! इस मिट्टी से तिलक करो,ये धरती हैं बलिदान की!
मधुरा घोलप