येवलेकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

गंगासागर तलावाला रोटेशन; नगराध्यक्ष राजेंद्र लोणारींच्या हस्ते जलपूजन

येवला : प्रतिनिधी
येवला शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार गंगासागर तलावाला पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडण्यात आले आहे. यामुळे गंगासागर तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. या तलावातील पाण्याचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच नगरसेवकांनी जलपूजन केले. या रोटेशनमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
येवला शहराला पाणीपुरवठा करणारा गंगासागर तलाव आटल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर येवला नगरपरिषदेच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी रोटेशन सोडण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली होती. याबाबत मंत्री भुजबळ यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला येवला शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात आली आणि गंगासागर तलावात पाणी सोडण्यात आले. परिणामी, तलाव पूर्णक्षमतेने भरला असून, येवला शहराचा पाणीप्रश्न सध्या तरी पूर्णतः मिटला आहे. या निर्णयामुळे येवला शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होणार असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी मंत्री भुजबळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, यावेळी येवला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, महेश काबरा, सचिन साबळे, बंटी परदेशी, जावेद लखपती यांच्यासह बंडू क्षीरसागर, सुनील जाधव, यती गुजराथी, निसार लिंबूवाले शेख, गणेश गायकवाड, संतोष जेजुरकर, सचिन सोनवणे आदी पदाधिकारी तसेच येवला नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या समन्वयातून येवला शहराचा महत्त्वाचा पाणीप्रश्न मार्गी लागल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

Yevlekar’s drinking water problem solved

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *