तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची तिघांनी धारदार शस्त्राने व डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेमुळे मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, छावणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
नितीन अर्जुन निकम (25, रा. जयभीमनगर, आयेशानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृताचा भाऊ अर्जुन निकम याच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नितीन गुरुवारी (दि.31) रात्री बारा वाजेच्या सुमारास नानावटी पेट्रोलपंपाजवळ उभा असताना एका दुचाकीवरून आलेल्या सचिन अहिरे ऊर्फ सच्या माया, परेश फुलचंद पगारे, केतन अजय अहिरे (सर्व रा. मालेगाव) या तिघांनी त्यास लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने मारहाण केली. यावेळी तिघांपैकी एका तरुणाने बाजूला असलेला दगड त्याच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात नितीन जागीच ठार झाला. यानंतर हे तिघेजण तेथून पळून गेले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे.