दिंडोरी : प्रतिनिधी
सप्तशृंगगडाच्या शीतकड्यावरून उडी मारून युवक-युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. वणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंगगडाच्या दक्षिणेस असलेल्या शीतकड्यावरून या युवक-युवतीने उडी मारून आत्महत्या केली. 25 ते 26 मे रोजी दुपारी अडीज वाजेच्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबतची माहिती भातोडे येथील पोलिसपाटील विजय राऊत यांनी पोलिसांना दिली. या जोडप्याची ओळख पटली असून, वणी येथील युवक आदित्य संजय देशमुख व फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ अशी त्यांची नावे आहेत. मोनिका शिरसाठ बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी वणी पोलिस ठाण्यात दिली होती.