वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसांत कुटुंबावर दुसरा आघात
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको परिसरातील दत्त चौक, लक्ष्मीनगर, महाले फार्म परिसरात राहणार्या 21 वर्षीय शुभम बाळासाहेब व्यापारी या युवकाने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी फळ व्यावसायिक होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर दहावा व तेरावा असे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर दोनच दिवसांत 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असल्याने बहुतांश नातेवाईक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. याच काळात शुभम घरातून अचानक बेपत्ता झाला. शुभम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी नाशिक शहरात त्याचा कसून शोध घेतला. मित्र, नातेवाईक, संभाव्य ठिकाणे तपासली. मात्र, चार दिवस उलटूनही शुभमचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर 19 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास सिडकोतील खांडे मळा परिसरातील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह तरंगताना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. यानंतर नातेवाइकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शुभम व्यापारी याचाच असल्याची खात्री झाल्यानंतर तो विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, शुभमने आत्महत्या का केली, यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. वडिलांच्या निधनामुळे तो मानसिक तणावात होता का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. व्यापारी कुटुंबावर ओढावलेल्या दु:खाने नागरिकही भावुक झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
Youth commits suicide in well in CIDCO