लोहाशिंगवे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
लोहाशिंगवे गावातील शांत वातावरणात भीतीचे सावट निर्माण करणारी दुर्दैवी घटना गुरुवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे घडली. लोहाशिंगवे परिसरात फिरणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात सुदाम महाळू जुंद्रे (वय 35) या तरुणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम जुंद्रे हे रात्रीच्या सुमारास गावाबाहेरील शेत परिसरात गेले असता बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी सुमारास पाचच्या दरम्यान स्थानिक शेतकरी आपला भाजीपाला घेऊन देवळाली कॅम्पकडे येत असताना त्यांना मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आवश्यक तपास सुरू केला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची तसेच परिसरात एआय सेंसर व कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात सापळे लावले असून, रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर विशेष निरीक्षण सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना रात्री बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे लोहाशिंगवे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांकडून वनविभागाच्या तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
“बिबट्याची प्रजाती वर्षातून दोनदा पिलांना (४ ते ५ पिल्ले) जन्म देते. त्यामुळे यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वनविभागाने त्यांना फक्त जंगलात सोडून देण्यापेक्षा त्यांच्यावर नसबंदी करावी. तसेच नरभक्षक बिबट्यांचा धोका असल्यास त्यांना जिवे मारून टाकावे.”
—- शिवाजी डांगे
माजी उपसरपंच लोहशिंगवे