डम्परने चिरडल्याने सुळेवाडीत तरुणाचा मृत्यू

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील सुळेवाडी- पाटपिंप्री मार्गावर सोमवारी (दि.3) डम्परखाली दुचाकीवरील तरुण चिरडून
मरण पावल्याची घटना घडली. या अपघातात पंकज बबन देवकर (वय 26) याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर डम्पर चालकाने जखमी तरुणाला चिरडून पळ काढल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर संबंधित डम्पर चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.3) दुपारी चार वाजेच्या सुमारास पंकज देवकर दुचाकीने सुळेवाडीकडून बारागाव पिंप्रीकडे जात असताना पाठीमागून आलेल्या डम्परने (एमएच 15- जेडब्ल्यू 1101) त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो दुचाकीसह रस्त्यावर पडला. मात्र, त्यानंतर डम्पर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी जाणीवपूर्वक त्याच्या अंगावर डम्पर घालून त्याला चिरडत पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी तरुणाला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दुसर्‍या दिवशी सकाळी सुळेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. डम्परचालकावर कठोर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुमारे पाचशे ग्रामस्थ रस्त्यावर होते. परिस्थिती गंभीर होत असल्याने एमआरडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक भरत जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत महसूल विभागाचे अधिकारी आले. मात्र, ग्रामस्थांनी तहसीलदारांनीच प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी, अशी मागणी केली. त्यानंतर तहसीलदार सुरेंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात नितीन शिरसाठ, परसराम म्हस्के, कैलास गुंजाळ, संतोष देवकर, विजय सातपुते, विनोद लांडगे, लक्ष्मण निकम, यश डावखर, शांताराम गुगळे, समाधान मस्के, सचिन मस्के आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी डम्परचालक अक्षय मधुकर खुळे (वय 27, वडांगळी, ता. सिन्नर) याच्याविरुद्ध पंकज देवकर याच्या जाणीवपूर्वक मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू पाटील पुढील तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *