18 ऑगस्टपर्यंत होणार गट, गण रचना जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
जवळपास साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी राज्यपालांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्यांना गट, गण प्रारूप रचना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी 18 ऑगस्टपर्यंत गट-गण रचना निश्चित करून राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आरक्षण निश्चिती होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मार्च 2022 मध्ये प्रस्तावित असताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीची संख्या निश्चित नसणे व ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण दिल्यास आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाते, या कारणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले होते. यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून लांबल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरशाहीची प्रशासकीय राजवट असल्याने तेच धोरणात्मक निर्णय घेत असल्याच्या कारणावरून सर्वोच्च नायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022 पूर्वीच्या आरक्षण पद्धतीनुसार घेण्याचे
निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यांत राबवण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार या आठवड्यात महानगरपालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश दिल्यानंतर 12 जून रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची गट-गण रचना करण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्यांना दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात 74 गट नाशिक जिल्हा परिषदेत 2017 च्या पंचवार्षिक निवडणुकीत 73 जिल्हा परिषद गट व 146 गण होते. दरम्यानच्या काळात ओझर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्याने एक गट कमी होऊन गटांची संख्या 72 झाली. दरम्यान, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ग्रामपंचायतीचेही नगरपरिषदेत रूपांतर झाल्याने आणखी एक गट कमी झाला. यामुळे 2011 च्या जनगणनेच्या आधारे गट-गण रचना जाहीर केल्यास गटांची संख्या 71 होईल, असे मानले जात होते. मात्र, ग्रामविकास विभागाच्या पत्रात नाशिक जिल्हा परिषदेच्या गट व गणांची संख्या अनुक्रमे 74 व 148 जाहीर केली आहे. मालेगाव, चांदवड व सुरगाणा या तालुक्यांत प्रत्येकी एक गट व दोन गण वाढवण्यात आले आहेत.
या नवीन आकडेवारीवरून निफाड तालुक्यातील गटांची संख्या दोनने कमी होऊन 8 झाली आहे, तर मालेगाव तालुक्यातील गटांची संख्या 8, चांदवड तालुक्यातील गटांची संख्या 5 व सुरगाणा तालुक्यातील गटांची संख्या 4 करण्यात आली आहे.
असे आहे वेळापत्रक
प्रारूप गट-गण रचनेची अधिसूचना : 14 जुलैपर्यंत प्रारूप गट-गण रचनेला हरकती घेणे – 21 जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांना हरकतींचा प्रस्ताव- 28 जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांंकडे हरकतींवर सुनावणी – 11 ऑगस्ट अंतिम गट-गण रचना सादर-18 ऑगस्ट 2025 पर्यंत